33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रशिरूरची लढत रंगात!

शिरूरची लढत रंगात!

शिरूर लोकसभा मतदार संघ

पुणे : विनायक कुलकर्णी
शिरूर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि या मतदार संघाचे तीन वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या ंिरगणात समोरासमोर आले असल्याने ही निवडणूक लक्षवेधी झाली आहे .या मतदार संघामध्ये ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर असला तरी दोन विधानसभा मतदार संघ शहरी भागातील आहेत. त्यामुळे मतदानाचे प्रमाण कसे वाढेल यावर उमेदवारांच्या विजयाचे गणित अवलंबून असणार आहे असे दिसते. सोमवारी शिरूरसह, पुणे जिल्ह्यातील मावळ आणि पुणे लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे.

सन २०१९ च्या निवडणुकीत विद्यमान खासदार कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते पण त्यावेळी खासदार कोल्हे यांनी विजय मिळविला पण आता बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा दोन्ही उमेदवार समोरासमोर येऊन उभे राहिले आहेत. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांची चिन्हे बदलली आहेत. त्यामुळे या बदलत्या स्थितीत खासदार कोल्हे यांच्या समोर खासदारकी कायम ठेवण्याचे आव्हान तर माजी खासदार पाटील यांना निवडणूक ंिजकण्याचे आव्हान असणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक पार पडल्यामुळे नेत्यांनी देखील जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे.

जिल्ह्याच्या एकूण राजकीय स्थितीचा विचार केला तर कोंग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाची पकड राहिली आहे. मात्र गेल्या काही कालावधीत राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष आणि शिवसेना या पक्षात पडलेली फुट त्यानंतर बदलत गेलेली राजकीय स्थिति या बाबी निवडणुकीत महत्वाच्या ठरणार आहेत. एका अर्थाने मतदानाच्या माध्यमातून बदलत्या मानसिकतेचे प्रतिबिंब पहावयास मिळणार आहे असा अंदाज वर्तविण्यात येतो आहे. त्यामुळे या निवडणुकीतील लढत अटीतटीची होण्याची चर्चा आहे. आता असा एक विचार प्रवाह दिसतो तो म्हणजे विशेषता ग्रामीण भागात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सहानुभूती मिळणे शक्य आहे.

या लोकसभा मतदार संघात शिरूर, आंबेगाव, जुन्नर ,खेड, हडपसर आणि भोसरी या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. यातील शिरूर विधानसभा मतदार संघात ज्येष्ठ नेते पवार यांचे नेतृत्व मानणारे आमदार अशोक पवार आहेत तर जुन्नर मध्ये आमदार अतुल बेनके, आंबेगावमध्ये विद्यमान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खेडमध्ये आमदार दिलीप मोहिते, हडपसर मध्ये चेतन तुपे आणि भोसरीमधे भाजपचे आमदार महेश लांडगे आहेत. शिरूर मतदार संघाचा अपवाद वगळता अन्य पांच विधानसभा मतदार संघातील आमदार महायुतीकडे असल्याने कोणाकडे विजयाचे पारडे झुकणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसात या मतदार संघात जाहीर सभांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप आणि परस्परांवर टीका करण्यात येत आहे. त्यामुळे प्रचारामधे रंगत वाढली आहे.

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या मतदार संघात शेतकरी वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात शेतक-यांसाठी सरकारने काय केले असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे. महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये होणारी लढत औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे. तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मूळ पक्ष सोडून राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष अजित पवार गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे ही लढत अधिकच चुरशीची होणार आहे. या मतदार संघातील ग्रामीण भागातील मतदाना प्रमाणे शहरी भागातील मतदानाची टक्केवारी विजयाचे पारडे कोणत्या बाजूला झुकणार हे स्पष्ट करणारे ठरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. ही निवडणूक भावनिक की बदलती राजकीय स्थिती याचा आगामी काळात होर्णा­या निवडणुकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे अशी चर्चा रंगत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR