पुणे : प्रतिनिधी
ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. साखरेच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखर किलोमागे २ रुपयांनी महागली आहे. येत्या काही दिवसांमध्ये साखरेचे दर आणखी वाढणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना गणेशोत्सवापूर्वीच महागाईच्या झळा लागण्यास सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या काळात साखर महागल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
सणासुदीच्या काळात साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सवापूर्वीच साखरेचे दर महागले आहेत. सणासुदीच्या काळात मिठाई आणि प्रसादामध्ये साखरेचा वापर केला जाते. आता साखर महागल्यामुळे सर्वासामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. साखरेच्या दरात किलोमागे २ ते ३ रुपयांनी वाढ झाली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने कारखानदारांकडून साखरेच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात साखरेचे भाव कडाडले आहेत.
तसेच, केंद्र सरकारने साखरेचा मासिक कोटा कमी केल्याने दरवाढ झाली असल्याने नागरिकांना दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. येत्या काही दिवसांत साखरेचे दर आणखी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून साखरेचे उत्पादन कमी होत आहे त्याचाही फटका बसत आहे. उत्पादन खर्च महागल्यामुळे येणा-या काळात साखरेची आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे.