लातूर : प्रतिनिधी
पुणे येथील जय वैभवीलक्ष्मी फाउंडेशन यांच्या वतीने २०२६ चा देण्यात येणारा सहकार भुषण पुरस्कार राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना जाहीर करण्यात आला. पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता केंद्रीय सहकार व विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय वैभवीलक्ष्मी फाउंडेशन अध्यक्ष उल्हासदादा पवार राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, माजी मंत्री, आमदार सतेज पाटील, आमदार भीमराव तापकीर, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख, ज्येष्ठ अभिनेत्री आशाताई काळे, अॅड. सौरभ अंकलकोटे पाटील, जय वैभवलक्ष्मी ग्रुपचे संस्थापक प्रा. डॉ. व्ही. एस. अंकलकोटे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे, आवाहन जय वैभवलक्ष्मी ग्रुपचे उपाध्यक्ष शशिकांत पागे, विश्वस्त डॉ. स्वरूप एकलुरे, अॅड. मिथुन गुरव यांनी केले आहे.















