परभणी : प्रतिनिधी
इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हे आणि डेटा उल्लंघनासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ज्यामुळे सायबर कायद्याची गरज निर्माण झाली आहे, कायदा केला मात्र अंमलबजावणी झाली नाही, असे प्रतिपादन वृत्तपत्रविद्या विभागप्रमुख डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील शैक्षणिक विकास समिती व सैनिकशास्त्र विभागातर्फे ‘सायबर कायदा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रेणुकादास बोनर यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर प्रा. संदिपान सांगुळे, प्रा. सूर्यकांत फुटके, डॉ. आनंद घन यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संस्थापक, प्राचार्य डॉ. शिवाजीराव दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. शिंदे म्हणाले, भारतातील माहिती तंत्रज्ञान कायदा २००० साली मंजूर झाला. सायबर गुन्हे आणि डेटा उल्लंघना सारख्या घटना वाढल्या आहेत. ज्यामुळे सायबर कायद्याची गरज निर्माण झाली. हा कायदा सायबर गुन्हे आणि डिजिटल व्यवहाराशी संबंधित आहे.
सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा, बौद्धिक संपदा हक्क आदी विषयांवर सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रा. सांगुळे, प्रा. फुटके, प्रा. डॉ. तुकाराम बोबडे यांनी सायबर गुन्ह्याला कसे आपण बळी पडतो, याचा अनुभव थोडक्यात सांगितला. यावेळी विद्यार्थी रोशन घाटके यांनीही आपला अनुभव सांगितला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नरसिंगदास बंग यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बालाजी गव्हाळे यांनी केले तर आभार डॉ. आनंद घन यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

