नवी दिल्ली : वृत्तसंस्था
डॉटने टेलिकॉम कंपन्यांना कॉलिंग नेम प्रझेंटेशन (सीएनएपी) ही सेवा तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. दूरसंचार कंपन्या सीएनएपीची चाचणी घेत आहेत. ही सेवा सुरू होताच इनकमिंग कॉलरची ओळख अधिक सुलभ होणार आहे. स्पॅम आणि घोटाळेबाजांच्या कॉलला अटकाव करण्यासाठी दूरसंचार विभागाने पाऊल उचलले आहे. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांना आता याची अंमलबजावणी कारावी लागणार आहे.
दूरसंचार विभागाची दूरसंचार कंपन्यांसोबत मागच्या आठवड्यात एक बैठक झाली. या बैठकीत सध्या सीएनएपीची चाचणी सुरू केली आहे. स्मार्टफोनच्या युजर्ससाठी हे तंत्रज्ञान काम करणार आहे. २ जी फिचर फोनच्या युजर्सना याचा फायदा होणार नाही. परंतु इतर स्मार्टफोनला सीएनएपी लागू होताच मोबाईलवर येणा-या कॉलरचे नाव दिसणार आहे. सीमकार्ड ज्यांच्या नावावर आहे, तेच नाव मोबाईलवर दिसणार आहे. त्यामुळे बनावट कॉलला आता आपोआप आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच कॉलद्वारे होणारी ऑनलाईन फसवणूकही टळणार आहे.
सध्या अनेकांना नाव एकाचे येते, फोन दुस-याच येतो. टेलिमार्केटिंग, फ्रॉड करणारे आदींचे फोन घेऊन लोक वैतागले आहेत. अनेकांना लाखोंचा चुनाही लागला आहे. यामुळे आता यापासून वापरकर्त्यांना सोडविण्यासाठी दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांना सक्तीचे आदेश दिले आहेत. आता सीएनएपी लागू झाल्यास इन्कमिंग कॉलवेळी सीमकार्ड ज्यांच्या नावावर आहे, त्यांचे खरे नाव दिसणार आहे.
यासाठी कॉलिंग नेम प्रझेंटेशन (सीएनएपी) ही सेवा तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यातून स्पॅम आणि घोटाळेबाजांच्या कॉलला आपोआप अटकाव होणार आहे. सध्या अनेकदा नाव मुलाचे येते आणि मुलगी बोलत असल्याचे अनुभव आले आहेत. तसेच सरकारी यंत्रणेचे नाव टूकॉलरसारख्या वेबसाईटवर नोंदवून विमा, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोनसाठी फोन केले जात आहेत. अनेकदा पर्सनल नंबरही वापरले जात आहेत. त्यामुळे नेमका फोन कोणाचा आला, हे समजणे खूप महत्त्वाचे आहे.
सध्या कंपन्या यावर प्रयोग करीत असून, काम सुरू असल्याचे या कंपन्यांनी डॉटला कळविले आहे. इंटर सर्कल कॉलवर हे काम केले जात आहे. हे तंत्रज्ञान उपलब्ध होताच ते लागू केले जाणार असल्याचा शब्द कंपन्यांनी दिला आहे. तांत्रिक अडचणींमुळे हे २ जी नेटवर्क लागू करता येणार नाही, असेही कंपन्यांनी डॉटला कळविले आहे.
सीएनएपी पुरवणी सेवा
सीएनएपी ही एक सप्लिमेंटरी सर्व्हिस आहे. ही सेवा मोबाईल फोनच्या स्क्रीनवर कॉलरचे नाव दाखविते. सध्या ट्रुकॉलर, भारत कॉलर आयडी अॅण्ड अॅन्टी स्पॅम हे थर्ड पार्टी अॅप्सही सीपीएनआय सेवा पुरवितात. परंतु ही सेवा विश्वासार्ह नाही. त्यामुळे ट्रायने सीएनएपीद्वारा गेल्या वर्षी केलेल्या शिफारशी केवायसी कागदपत्राच्या आधारे नोंदवलेल्या नावाच्या आधारावर आहे. या सेवेमुळे ख-या कॉलरची ओळख पटविणे सोपे जाणार आहे.