30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रसुसगाव येथे सिलिंडरचा स्फोट

सुसगाव येथे सिलिंडरचा स्फोट

२० झोपड्या जळून खाक

पुणे : सुसगाव येथे कामगारांच्या झोपड्यांना आग लागण्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ९ बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून एका तासात आगीवर नियंत्रण मिळविले.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सुसगाव येथे बेलाकासा इमारतीशेजारी असणा-या कामगारांसाठी पत्राच्या शेडच्या ५० झोपड्या आहेत. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास येथे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कशाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या वतीने गांभीर्य लक्षात घेऊन औंध, पाषाण, कोथरूड, वारजे येथील बंब तसेच एक वॉटर टँकर आणि पीएमआरडीए दोन बंब व वॉटर टँकर व हिंजवडी एमआयडीसी येथील १ बंब अशी ९ वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली होती.

पत्र्याचे शेड असलेल्या झोपड्यांना मोठी आग लागली होती. आतमध्ये कोणी अडकले आहे का? हे पाहत अग्निशमन दलाच्या वतीने आगीवर चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला. आग इतर झोपड्यांमध्ये पसरू नये याची खबरदारी घेऊन सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणून पुढील धोका दूर केला. या आगीत झोपडपट्टीतील घरगुती वापराच्या तीन सिलिंडरचा स्फोट होऊन आग भडकली. या झोपडपट्टीतील घरगुती वापराचे छोटे-मोठे २८ सिलिंडर जळाले आहेत.

अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झाले नाही. घटनास्थळी कामगारांच्या ५० झोपड्या आहेत. शुक्रवारी लागलेल्या आगीत २० झोपड्या पूर्ण जळाल्या, तर इतर ३० झोपड्यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी हानी होऊ दिली नाही. कामगारांच्या झोपड्यांतील घरगुती साहित्य व गृहोपयोगी वस्तू पूर्णपणे जळाल्याने मोठे नुकसान झाले असून, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR