34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयराम मंदिरावरून पाकचा राष्ट्रसंघात थयथयाट; भारताने मात्र फटकारले

राम मंदिरावरून पाकचा राष्ट्रसंघात थयथयाट; भारताने मात्र फटकारले

न्यूयॉर्क : भारताने संयुक्त राष्ट्रात पुन्हा एकदा पाकिस्तानला चांगलेच झोडपून काढले. संपूर्ण जग प्रगती करत असताना पाकिस्तान केवळ एका मुद्द्यावर अडकला आहे, असा टोला भारताने लगावला.

खरे तर, संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील इस्लामाबादच्या उच्चायुक्तांनी अयोध्येतील राम मंदिर आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा उल्लेख केल्यावर संतापल्या होत्या. त्यावेळी कंबोज यांनी पाकिस्तानला फटकारले.

नुकतेच पाकिस्तानने १९३ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र महासभेत इस्लामफोबियाला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना हा ठराव मांडला होता, ज्याच्या बाजूने ११५ देशांनी मतदान केले. तर भारत, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, इटली, युक्रेन आणि ब्रिटनसह ४४ देशांनी मतदानात भाग घेतला नाही. बाजूने ११५ मते पडल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

दरम्यान, पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी अयोध्येतील राम मंदिर आणि सीएए संदर्भात काही टिप्पण्या केल्या होत्या, ज्यावर संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी प्रतिक्रिया दिली.

त्या म्हणाल्या, शिष्टमंडळ आणि त्यावर केलेल्या टिप्पण्यांबाबत एवढेच म्हणता येईल की, हे खोटे आहे. संपूर्ण जग प्रगती करत असताना पाकिस्तान फक्त एकाच मुद्द्यावर अडकला आहे.

दरम्यान आपल्या भाषणात अक्रम यांनी अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीचाही उल्लेख केला होता.

कंबोज म्हणाल्या, माझ्या देशाशी संबंधित विषयांवर या शिष्टमंडळाचा मर्यादित आणि चुकीचा दृष्टीकोन पाहणे खरोखरच दुर्दैवी आहे, विशेषत: जेव्हा सर्वसाधारण सभेने संपूर्ण सदस्यत्वाकडून ज्ञान, सखोलता आणि जागतिक दृष्टीकोन आवश्यक असलेल्या विषयावर विचार केला. कदाचित या शिष्टमंडळाला ते माहिती नसेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR