24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रसेट परीक्षाही वर्षातून दोनवेळा?

सेट परीक्षाही वर्षातून दोनवेळा?

समितीच्या निर्णयाच्या आधारे बदल अपेक्षित

पुणे : प्रतिनिधी
सहाय्यक प्राध्यापकपदाच्या पात्रतेसाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘नेट’ परीक्षेप्रमाणेच राज्याची ‘सेट’ ही वर्षातून दोनदा घेण्याचा विचार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत सुकाणू समितीने गठित केलेल्या समितीच्या निर्णयांच्या आधारे हे नवे बदल अपेक्षित आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतली जाणारी यंदाची सेट परीक्षा जरी ऑफलाइन असली तरी त्यानंतरची परीक्षा मात्र ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा विचार आहे.

विद्यापीठाकडून शेवटच्या ऑफलाइन सेटचे आयोजन करण्यात येणार असून, त्याचे वेळापत्रक पुढील आठवड्यात घोषित केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी सुमारे एक महिन्यांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर परीक्षा अर्जांची छाननी, प्रवेशपत्र तयार करणे आदी गोष्टींसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

परिणामी सेट परीक्षा येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात आयोजित केली जाणार असल्याची शक्यता आहे. सोमवारपासून सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ऑनलाइन पद्धतीने सेट परीक्षा सुरू झाल्यानंतर वर्षातून दोनदा सेटच्या आयोजनाचा विचार आहे.

शेवटची ऑफलाईन ‘सेट’
महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षेचे आयोजन केले जाते. काही वर्षांपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत समितीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीत मार्च-एप्रिल २०२४ मध्ये होणारी सेट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी. मात्र, त्यानंतरच्या पुढील सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात, असे निश्चित करण्यात आले.

पडताळणी नंतरच ऑनलाईन सेट –
परीक्षा केंद्राची प्रत्यक्ष पाहणी, इंटरनेटची बँड विड्थ आणि सुविधांच्या आधारेच ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कोणती अडचण येऊ नये, तसेच परीक्षेवेळी गोंधळ होऊ नये म्हणून आधी प्रत्यक्ष चाचणी करूनच ऑनलाईन सेट परीक्षेचा विचार केला जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR