लातूर : प्रतिनिधी
लातूरची ओळख शिक्षणाची पंढरी अशी झाली असून देश-विदेशात लातूरचा विद्यार्थी आपले भविष्य उज्ज्वल करत आहे. लहान वयापासूनच अनकेजण डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहू लागतात. परंतु मध्यमवर्गीय अथवा गरीब कुटुंबियांना हे स्वप्न साकार करताना खूप त्रास सहन करावा लागतो. यातून मुले आत्महत्येसारखे पाऊल उचलतात. लातूरमधून अशीच एक घटना समोर आली, जिथे आर्थिक विवंचनेतून १७ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे.
दरम्यान, लातूरमधील या घटनेने एकच खळबळ माजली आहे. लातूर शहरातील एका नामांकित महाविद्यालयात अकरावीत शिकणा-या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. उपलब्ध माहितीनुसार ही मुलगी मूळची धाराशिव जिल्ह्यातील विजोरा या गावातील होती. लातूरला ती शिक्षणासाठी आली होती. घरची परिस्थिती सुरुवातीपासून बेताची. तरीदेखील तिच्या आई-वडिलांनी तिला लातूर शहरातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश दिला होता. दहावीत १०० पैकी १०० गुण घेतले असल्यामुळे ती शिक्षणात उज्ज्वल भविष्य काढेल असा तिच्या आई-वडिलांना विश्वास होता.
प्रत्यक्षात मात्र शिक्षणाचा, वसतिगृहात राहण्याचा आणि खानावळीसह इतर खर्च जास्त होत असल्याने घरातल्या लोकांची ओढाताण होत असल्याची जाणीव तिला झाली होती. याबाबत ती आपल्या आईकडे सातत्याने नाराजीसुद्धा व्यक्त करत होती. सरतेशेवटी कुटुंबाची होणारी ही आर्थिक विवंचना पाहून या मुलीने अखेर टोकाचे पाऊल उचलले आणि वसतिगृहातील स्वत:च्या रूममध्ये गळफास घेत तिने आयुष्य संपवले. प्राथमिक तपासातून यासंदर्भातील माहिती समोर आली. ‘सॉरी मम्मी-पप्पा’ असे लिहिलेली एक चिठ्ठी तिच्या रूममध्ये सापडल्याचेही सांगितले जात आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आता पुढील तपास पोलिस करत आहेत.