हिंगोली : प्रतिनिधी
हिंगोलीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. बापाने पोटच्या लेकीची हत्या केली. नंतर स्वत:ला संपवले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. या दोन्ही मृत्यूंबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र, आता या मृत्यूचे गूढ उकलले आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हिंगोली शहरातील मस्तान शहा नगर भागात काल सकाळी बाप-लेकीचा मृत्यू झाल्याची माहिती उघडकीस आली. वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत होते. तर, त्यांची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. या घटनेची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली होती. हिंगोली पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांना या घटनेच्या तपासाबाबत धक्कादायक माहिती मिळाली. लेकीने लग्नासाठी नात्यातील मुलाला नकार दिला होता. याच गोष्टीचा राग वडिलांच्या मनात होता. या कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले होते.
याच कारणामुळे वडिलांनी लेकीला ठार मारण्याचे ठरवले. घटनेच्या दिवशी लेक झोपली होती. झोपलेल्या अवस्थेत आरोपी वडिलांनी तिचा गळा दाबला. त्यानंतर लेकीचा खून केल्यानंतर वडिलांना पश्चाताप झाला. त्यांनी स्वत:च्या हाताची नस कापली. तसेच घरात गळफास लावून आयुष्य संपवले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले.
हिंगोली पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक बाब उघडकीस आली. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

