लातूर : प्रतिनिधी
शुन्य ते १८ वयोगटातील सर्वच बालकांवर मोठ्या स्वरुपाचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’(आरबीएसके) कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या ‘आरबीएसके’ अंतर्गत पुण्यात काशीबाई नवले हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे बालकांंच्या मोठ्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. याबाबतचा करार राज्य कुटूंब कल्याण कार्यालयाने नुकताच हॉस्पिटलसोबत केला आहे. यामुळे बालकांसाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च करण्याची गरज पालकांना आता नाही.
या करारानूसार शुन्य ते १८ वयोगटातील बालकांसाठी न-हे येथील काशीबाई नवले हॉस्पटलमध्ये जन्मजात हृदयरोग (कंजेनायटल हर्ट डिसिज), अस्थिरोग शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, मेंदूची शस्त्रक्रिया (न्युरो सर्जरी), दातांची शल्यचिकित्सा (डेंटल सर्जरी), कानाचे उपचार (इएनटी) आणि डोळ्यांचे उपचार (आप्थॉल्मालॉजी) मोफत होणार आहेत.
आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्येही प्लास्टिक सर्जरी (फाटलेली, दुभंगलेली टाळू), -हदयशल्यचिकित्सा, अस्थिरोग शस्त्रक्रिया (ऑर्थोपेडिक सर्जरी), मेंदूची शस्त्रक्रिया (न्युरो सर्जरी), दातांची शस्त्रक्रिया (डेंटल सर्जरी), ऐकु येण्यासाठी क्वाक्लिअर इंप्लांट आणि डोळ्यांचे उपचार. हे उपचार केले जाणार आहेत. हे उपचार झाल्यावर त्याचे पैसे आरबीएसकेने ठरवलेल्या दरांनूसार देण्यात येणार आहेत. पुण्यासह नाशिक, वर्धा आणि मुंबईतही यासाठी हॉस्पिटल देण्यात आले आहेत. तेथेही उपचार होतील. नाशिक येथे सुयोग हॉस्पिटल व चोपडा मेडिकेअर अॅण्ड रिसर्च सेंट, मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल आणि वर्धा येथे आचार्य विनोबा भावे रुरल हॉस्पिटल यांचा समावेश आहे. धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयरोगावर उपचार होतील तर इतर हॉस्पिटलमध्ये नेहमीप्रमाणे -हदयरोगासह इतरही उपचार होतील.
















