17.9 C
Latur
Wednesday, November 20, 2024
Home३० मतदारसंघांत खटाखट मतदान!

३० मतदारसंघांत खटाखट मतदान!

मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली. या निवडणुकीचे मुलभूत वैशिष्ट्य म्हणजे मेट्रोसिटीतील मतदारांपेक्षाही गावक-यांनीच लोकशाहीचा आब राखला असे निदर्शनास येते.

लोकसभा निवडणुकीत मतदारांना अनेक अडचणी आल्या होत्या, त्यामुळे कमी मतदान झाले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीला त्या त्रुटी सुधारत मतदान केंद्रांवर अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. शहरांमधील मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, मतदानाची टक्केवारी पाहता मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावक-यांनीच विशेषत: ग्रामीण भागातील मतदारांनी लोकशाहीचा जास्त आब राखल्याचे दिसून येते.

राज्यातील शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह जास्त दिसून आला आहे. नक्षलग्रस्त परिसर अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी धडाडीने मतदान करुन मतदानाची सर्वाधिक टक्केवारी नोंदवली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी (६६.२७), भंडारा (६५.५८), आरमोरी (६०.५) आणि गडचिरोली (६९.६३) या तीन मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले.

१११ वर्षाच्या आजीचे मतदान
एकीकडे सेलिब्रेटींच्या मतदानाची चर्चा होत असताना दुसरीकडे गडचिरोलीमध्ये १११ वर्षांच्या आजीने मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यावेळी शालेय विद्यार्थ्यांकडून आजीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तर प्रशासनाकडून आजींचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत येथील फुलमती बिनोद सरकार या १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले. त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. फुलमती सरकार यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजी झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR