मुले अत्यवस्थ, रुग्णालयात उपचार
सोलापूर : प्रतिनिधी
उत्तर सोलापूर तालुक्यातील ति-हे गावात वडिलांनी स्वत:च्या तीन चिमुकल्या मुलांना विष पाजून स्वत:ही विष प्राशन केल्याची घटना उघडकीस आली. उत्तर सोलापूर तालुक्यातील ति-हे गावात ही घटना घडली. भीमाअण्णा वाघमारे (३४) असे विष प्राशन केलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो एका सिमेंट कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत होता.
भीमा वाघमारे आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होता. या वादातून पत्नी माहेरी निघून गेली होती. नातेवाईकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने सासरी परत येण्यास नकार दिला. याच मानसिक तणावातून भीमा वाघमारे याने आपल्या जानवी, प्रगती आणि बाबू या तीन लहान मुलांना वळसंगजवळील शेतात नेले. त्या ठिकाणी त्यांनी तिन्ही मुलांना विष दिले आणि त्यानंतर स्वत:ही विष घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या घटनेत भीमा वाघमारेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तिन्ही लहान मुलांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

