मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील बारावीचा निकाल उद्या म्हणजे ५ मे २०२५ रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. तर मंगळवारपासून (६ मे) महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीने घेण्यात येणा-या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील. दरम्यान, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली.
खालील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येतील :
results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
http://hscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com
दहावीचा निकाल १५ मे पूर्वी
दहावीचा निकाल देखील लवकरच जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुस-या आठवड्यात म्हणजेच १५ मे पूर्वी घोषित केला जाऊ शकतो. मार्च महिन्यात परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. मात्र अद्याप मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.