नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील तामसा आणि लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीच्या दोन स्वतंत्र घटना उघडकीस आल्या आहेत. यात एसबीआय पॉलिसीची रक्कम मिळवून देण्यासाठी एकाला ५ लाखांना गंडा घालण्यात आला. तर दुस-या प्रकरणात पेट्रोल पंपावरील कर्मचा-यांनी २. ५१ लाख रूपयांचा अपहार केला.
तामसा येथील प्रकरणात, ३ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत पीयूष सोमानी, रविकपूर, दिशा अग्रवाल, रिचा मिश्रा, गीता बॅनर्जी व अंकिता राणे (सर्व रा. तामसा) यांनी संगनमत करून फियार्दीला एसबीआय पॉलिसी बंद करणे, रक्कम परत मिळवून देणे, कस्टमर आयडी, इन्शुरन्स खाते सुरू करणे तसेच सर्व्हिस टॅक्स भरणे आदी कारणे सांगून ५ लाख ३६ हजार ४३८ रुपये भरायला लावले. मात्र, कोणतीही रक्कम परत न देता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवाजीनगर, तामसा येथील मोनिका राजेंद्रसिंह कच्छवेठेकर (वय २६) यांच्या फियार्दीवरून तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत सपे करीत आहेत.
दरम्यान, लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत साई श्रद्धा हिंदुस्थान पेट्रोल पंप, सुगाव (बु.) येथे काम करणा-या कर्मचा-्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी २०० लिटर पेट्रोल व २०० लिटर डिझेल, असा एकूण २ लाख ५१ हजार ५२० रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हिरालाल शर्मा, शिवराज स्वामी व परमेश्वर (रा. वाघी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी श्रद्धा दिपकसिंह रावत (वय ४७, रा. गाडीपुरा, नांदेड) यांच्या तक्रारीवरून लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.
















