सना : येमेनच्या किना-याजवळ लाल समुद्रात हिंदुस्थानी मालवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर जहाज उलटले आणि बुडाले. या जहाजामध्ये १३ भारतीयांसह १४ खलाशी होते. येमेनी कोस्ट गार्डने सर्वांची सुखरूप सुटका करत त्यांना मोखा बंदरावर आणले. परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध केला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यमेनच्या किना-याजवळ ‘एमएसव्ही फैझ नुरे ओलिया’ जहाजावर हल्ला करण्यात आला. रियाधमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी येमेनी अधिका-यांशी सक्रियपणे समन्वय साधत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. तसेच येमेनी अधिका-यांच्या सहकार्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने त्यांचे आभार मानले आहेत. याआधी जुलै महिन्यात, काळ्या समुद्रात व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला होता.
















