28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरबीडमधील हिंसाचारात १० टोळयांचा सहभाग

बीडमधील हिंसाचारात १० टोळयांचा सहभाग

२५४ जणांना अटक, ३०० जण अद्याप फरार

बीड : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. यामध्ये १० टोळयांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून २५४ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पाच मुख्य आरोपींचा समावेश असल्याची माहिती बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. यातील ३०० जण अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, सर्व आरोपी हे जिल्ह्यातीलच आहेत. यात एकही बाहेरचा नसल्याचेही त्यांनी सांगितले.

बीडमधील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत २००० हून अधिक लोकांची पोलिसांनी चौकशी केली. यामध्ये २५४ जण पोलिसांच्या ताब्यात आहेत तर १७ अल्पवयीन मुलेदेखील या जाळपोळ आणि दगडफेकीत सहभागी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकाही आरोपीला अद्याप जामीन मिळालेला नाही तर १३ आरोपींनी जामिनासाठी बीडच्या कोर्टात अर्ज केला होता. मात्र, त्यांचादेखील जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. आतापर्यंत जे आरोपी पोलिसांनी अटक केले, यामध्ये सर्वजण बीड जिल्ह्यातील आहेत. एकही आरोपी हा जिल्ह्याबाहेरचा नसल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

३० ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारात माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंके आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून देण्यात आले होते. सोबतच माजलगाव नगरपरिषदेची इमारत, भुजबळ समर्थक राऊत यांच्या हॉटेलला आग लावली होती. याचवेळी बीडमधील बसस्थानकावर उभ्या असलेल्या अनेक बसेसची तोडफोड केली. यातून शासकीय कार्यालये, राजकीय पक्षांची कार्यालयेही सुटले नाहीत.

तपासात सीसीटीव्ही फुटेजचा आधार
या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजचा आधार घेतला. आतापर्यंत जे आरोपी निष्पन्न झाले, त्यांच्या जवाबावरून आणखी ३०० लोकांची ओळख पटली आहे. त्यांचादेखील शोध पोलिस घेत आहेत.

नुकसान भरपाई आरोपींकडून होणार
बीड शहर आणि माजलगावमध्ये झालेल्या हिंसाचारात ११ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या सर्व नुकसानीची वसुली आरोपीकडून केली जाणार असून तसा अहवाल तयार होत आहे. आरोपींनी ही भरपाई दिली नाही तर त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून वसुली होईल, असे पोलिसांनी याआधीच स्पष्ट केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR