आयझोल : मिझोरामहून एक भुस्खलनाची बातमी येत आहे. दगडांच्या खाणीमध्ये अपघात झाला आहे. ढिगा-याखालून १० जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, तर दोन जणांना वाचविण्यात आले आहे. अद्याप अनेक मजूर या ढिगा-याखाली अडकलेले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत १० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यापैकी सहा मजूर हे बाहेरील राज्यातील आहेत. मृतांची ओळख पटविण्याचे काम बाकी आहे. तर वाचविण्यात आलेला एक व्यक्ती मिझोरामचा आहे. मिझोरामची राजधानी आयझोलमध्ये हा अपघात झाला आहे. रेमल चक्रीवादळामुळे आधीच या भागात प्रचंड नुकसान झाले होते. यातच मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास मेल्थम आणि हिमेनच्या सीमेवर एका दगडाच्या खाणीत भूस्खलन झाल्याचे वृत्त आले. यामध्ये आजुबाजुला असलेल्या अनेक घरांना नुकसान झाले आहे. नोव्हेंबर २०२२ मध्येही अशीच दुर्घटना घडली होती. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता.