इस्लामाबाद : पाकिस्तानच्या कमकुवत सुरक्षा व्यवस्थेमुळे आता त्याचे बडे समर्थक पाकिस्तान सोडून जाऊ लागले आहेत. पाकिस्तानातील अंतर्गत अशांतता आणि दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीमुळे व्यापाराचे वातावरण बिघडले आहे. तेल आणि वायू शोधात गुंतलेल्या १० हून अधिक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांचे व्यवसाय बंद केले आहेत. आता पाकिस्तानात फक्त तीन आंतरराष्ट्रीय कंपन्या तेल आणि वायूचा शोध घेत आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील तेल उत्पादनात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. ऊर्जा संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवर दरवर्षी १.९१ लाख कोटी रुपये खर्च करतो. यापैकी १.३३ लाख कोटी रुपये पेट्रोल आणि डिझेलवर तर ५४ हजार कोटी रुपये गॅसवर खर्च केले जातात.
पाकिस्तान सरकारशी संबंधित एका अधिका-याचे म्हणणे आहे की, परदेशी कंपन्या निघून गेल्यानंतर पाकिस्तानला परदेशातून अधिक तेल आणि वायू आयात करावा लागू शकतो, ज्यामुळे आर्थिक संकट आणि रोखीच्या तुटवड्याने त्रस्त असलेल्या पाकिस्तानसाठी आणखी वाईट दिवस येऊ शकतात. माजी पेट्रोलियम सचिव आणि ऊर्जा तज्ज्ञ गुलाम साबरी म्हणाले की, सुरक्षेच्या परिस्थितीव्यतिरिक्त राजकीय अस्थिरता आणि व्यवसायासाठी अनुकूल धोरणांचा अभाव यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. सरकार आणि उद्योग यांच्यात संवाद नसल्यामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. साबरी म्हणतात की नायजेरियाची परिस्थिती सुधारली आहे तर पाकिस्तान का सुधारू शकत नाही? परिस्थिती सुधारली नाही तर त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसणार असून, त्यांना पेट्रोल, डिझेल, गॅससाठी आणखी पैसे खर्च करावे लागतील.
इटालियन कंपनीनेही पाकिस्तान सोडला
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये कोणतीही कंपनी आपले काम कसे सुरू ठेवू शकते? तेथे कामाची परिस्थिती नाही. कंपन्यांच्या कर्मचा-यांवर सातत्याने हल्ले होत आहेत. कंपन्यांकडून मदतीसाठी वारंवार विनंती करूनही सुरक्षा पुरवण्यात आली नाही. याच कारणामुळे २० वर्षांपासून पाकिस्तानात कार्यरत असलेल्या इटालियन तेल आणि वायू कंपनी ईएनआयला देश सोडावा लागला. तिने आपला संपूर्ण व्यवसाय पाकिस्तानच्या स्थानिक कंपनी हबकोला विकला. २०१८ मध्ये ही कंपनी पाकिस्तानला दररोज ३० लाख घनमीटर गॅस पुरवत होती. ही कंपनी जगातील ७ सुपर मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक आहे आणि पाकिस्तानची सर्वात मोठी गॅस उत्पादक कंपनी आहे. याच्या दोन वर्षांपूर्वी स्ािंगापूरची कंपनी प्यूमा एनर्जीही पाकिस्तानातून निघून गेली होती.