लातूर : प्रतिनिधी
लातूरच नव्हे तर संपूर्ण देशभरात नावाजलेल्या शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे सलग ४१ वर्षे अध्यक्ष राहिलेले माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे दि. २१ एप्रिल रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली. एक आदर्श, विद्वान तसेच चतुरस्र व्यक्ती होते. संस्कृत, प्राचीन वेद वाङमयाचे गाढे अभ्यासक होते. गोर गरीबांचे डॉक्टर, प्रख्यात बालरोग तज्ज्ञ अशी ख्याती असलेले डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाबद्दल असंख्य मान्यवरांनी ‘एकमत’व्यासपीठावर शोक व्यक्त केला. तो असा….
मार्गदर्शकाला मुकलो
शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाने आम्ही मार्गदर्शकाला मुकलो आहोत. तत्त्वनिष्ठ, निस्पृह, पारदर्शक आणि अखंड प्रेरणास्रोत असलेले डॉ. गोपाळराव पाटील यांच्या जाण्याने शिक्षण, राजकीय सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. संस्था चालवीत असताना त्यांनी पदोपदी सांगितलेली ध्येय-धोरणे, विचार कायम पुढचा मार्ग दाखवत राहतील. ते ख्यातनाम बालरोग तज्ज्ञ होते. ते आरोग्य, शिक्षण, राजकारण आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. आदर्श कारभार, गुणवत्ता धोरणाला पाठबळ देत त्यांनी लातूर पॅटर्नमध्ये मोलाचे योगदान दिले.
– बी बी ठोंबरे,  सचिव, शिवछत्रपती शिक्षण संस्था, लातूर
डॉ. गोपाळराव पाटील यांचे संस्थेत मोठे योगदान
डॉ. गोपाळराव पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शिव छत्रपती शिक्षण संस्थेची स्थापना, राजर्षी शाहू महाविद्यालयाचा शिक्षण क्षेत्रात नावलौकिक झाला. १९७१ पासून आजपर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली मला शैक्षणिक कार्याची, सेवेची संधी मिळत गेली. डॉक्टरांना प्रत्येक विषयाचा अभ्यास,प्रचंड वाचन आणि स्पष्टता होती. संस्था अध्यक्ष आणि राज्यसभेतील खासदार अशा भूमिका वठविताना त्यांनी शिक्षण क्षेत्राला राजकारणापासून अलिप्त ठेवले. त्यांना सर्वपक्षीय मान्यता होती. शिक्षण, समाजकारण, राजकारण, आणि वैद्यकीय व्यवसायात त्यांनी नैतिक मूल्ये जपली. त्यांना माझी विनम्र आदरांजली.
-प्राचार्य अनिरुद्ध जाधव
शाहू लातूर पॅटर्नचे जनक हरवले
शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी कळली. विश्वास बसेना, मन हेलावून जाणारी ही घटना आहे. माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिव छत्रपती शिक्षण संस्थेच्या शाहू महाविद्यालया लातूरने  शैक्षणिक पॅटर्नचा देशभरात नावलौकिक करण्यामध्ये मोठा वाटा राहिला आहे. जिल्ह्यातील पहिले बालरोगतज्ज्ञ म्हणून त्यांची वेगळी ओळख शहरात राहिलेली आहे.  त्याबरोबर रोटरी क्लब, प्रजापती ब्रह्माकुंमारी, अध्यात्मिक केंद्र, विविध धार्मिक, सामाजिक, कार्यात ते पदाधिकारी व सक्रीय सहभागी असायचे त्यांच्या निधनाने लातूर जिल्ह्याच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या पाटील कुटुंबाच्या  दु:खात देशमुख परिवार सहभागी आहे.
-माजी मंत्री दिलीपराव देशमुख
प्रामाणिक आणि निष्ठेने शैक्षणिक कार्य करणारे व्यक्तिमत्त्व हरपले
शिक्षणमहर्षी उपाधीसाठी समर्पक ठरावे, असे महान कार्य करणारे, शिक्षण क्षेत्रातील थोर  मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ, ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ, माजी खासदार, लातूरमधील नामवंत शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खदायक आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात मी व माझा संपूर्ण परिवार सहभागी आहे. त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
अत्यंत निस्वार्थ भावनेने, वैद्यकीय, शिक्षण, सामाजिक अशा विविध क्षेत्रात अनेक दशके कार्यरत राहिलेले ज्येष्ठ नेते डॉ. गोपाळराव पाटील, जुने जाणते, समाजाभिमुख व्यक्तिमत्व होते. लातूर शहरात जुन्या पिढीतील बालरोग तज्ज्ञ म्हणून ते सुपरचित राहिले. लातूर-धाराशिव जिल्ह्यातील जनतेची त्या काळातील आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्यांनी अत्यंत कमी शुल्कात वैद्यकीय सेवा केली. पुढे शिवछत्रपती शिक्षण संस्थेची जबाबदारी त्यांच्याकडे आल्यानंतर, अत्यंत प्रमाणिकपणे आणि निष्ठेने त्यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य केले.
शिव छत्रपती शिक्षण संस्थेमार्फत चालणारे राजर्षी शाहू महाविद्यालय, जिजामाता विद्यालय, यशवंत विद्यालय, संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल या व इतर शाळा, महाविद्यालयातून त्या नावांना शोभेल अशा पद्धतीने त्या महान व्यक्तींच्या विचारांची शतप्रतिशत अंमलबजावणी त्यांनी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहजगत्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत त्यांनी राजर्षी शाहू महाविद्यालयाची कीर्ती महाराष्ट्र, देश आणि जागतिक पातळीवर पोहोचवली. या महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी दरवर्षी वैद्यकीय महाविद्यालये आणि नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवत आहेत. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन विविध प्रशासकीय पदांचे मानकरी ठरत आहेत.शिक्षण संस्थेतील सर्वच शाळा महाविद्यालयाच्या यशाचा हा आलेख मागच्या अनेक वर्षापासून वाढतोच आहे. या शिक्षण संस्थेच्या शाळा महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले हजारो उच्चशिक्षित तरुण आज जगभरात उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे जगभरात लौकिक असलेल्या लातूर शैक्षणिक पॅटर्नचे खरे शिल्पकार हे डॉ. गोपाळराव पाटील ठरतात.
भारतीय संसदेच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजे राज्यसभेत डॉ. गोपाळराव पाटील यांना खासदार म्हणून जाण्याची संधी मिळाली तेव्हा त्या सभागृहाला साजेल असे कार्य त्यांच्या माध्यमातून घडले आहे. अत्यंत अभ्यासू खासदार म्हणून तेथेही त्यांनी लौकिक मिळवला होता. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होतेच, त्याच बरोबर, लातूरच्या शैक्षणिक, सामाजिक जडणघडणीत उभय नेत्यांमध्ये नेहमी विचारविनिमय आणि चर्चा होत असत. डॉ गोपाळराव पाटील यांच्या सूचनांचा स्वीकार करून विकासरत्न विलासराव देशमुखयांनी  लातूरमधील अनेक शैक्षणिक, सामाजिक  प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि केंद्र शासनामार्फत सोयी, सुविधा उभारल्या आहेत. डॉ. गोपाळराव पाटील यांचे वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक या सर्व क्षेत्रातील कार्य आणि विचार कायम दीपस्तंभ म्हणून प्रेरणादायी आणि अनुकरणीय राहतील.
-माजी मंत्री, आमदार अमित देशमुख
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी 
शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ आणि लातूर जिल्ह्याचे माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील (आप्पा) यांचे दु:खद निधन झाले. ही बातमी अत्यंत वेदनादायी आहे. डॉ. गोपाळराव पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात केवळ सेवाच दिली नाही, तर शिक्षण क्षेत्रात शिव छत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले. एक संयमी, सुसंस्कृत आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने लातूर जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आयुष्यभर जपलेली मूल्ये, तत्त्वनिष्ठता आणि सेवाभाव यांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आदरणीय आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि पाटील परिवाराला या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो ही प्रार्थना.
-माजी आमदार धिरज विलासराव देशमुख
लातूरच्या शैक्षणिक क्रांतीचा महामेरू हरपला 
लातूर येथील शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे संस्थापक, बालरोगतज्ज्ञ आणि माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्यांच्या जाण्याने केवळ लातूर जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. डॉ. गोपाळराव पाटील यांनी वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून जनसेवा करतानाच, शिक्षणाचे महत्त्व ओळखून लातूरमध्ये शिवछत्रपती शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या मार्गदर्शनाखालील राजर्षी शाहू महाविद्यालयाने ‘लातूर पॅटर्न’च्या माध्यमातून राज्याला आणि देशाला अनेक गुणवंत विद्यार्थी दिले. लातूरची शैक्षणिक ओळख राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवारास मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR