मुंबई : राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांनी कुणबी प्रमाणपत्र सुलभतेने मिळण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश आज निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात या समितीची आढावा बैठक न्या. संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस सर्व समिती सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे मनोज जरांगे यांचे प्रतिनिधीही जालना जिल्हाधिकारी कार्यालय तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठकीत उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपले म्हणणे बैठकीत मांडले.
मराठवाड्यात ८ जिल्ह्यात १४ हजार ९७६ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी ९ हजार ७५५ दस्ताऐवजांचे स्कॅनिंग करण्यात आले असून ८ हजार ७२९ पुराव्यांचे भाषांतराचे काम करायचे आहे. हे पुरावे मोडी तसेच ऊर्दू भाषेत आहेत. त्यापैकी ३३१२ पुराव्यांचे भाषांतर मराठीत झाले आहे. समितीने आतापर्यंत ४ हजार २८२ संकेतस्थळावर अपलोड केले आहे. या दस्ताऐवजाच्या आधारे मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.
मराठा विद्यार्थ्यांसाठी
वसतीगृहाची स्थापना
राज्यातील सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलांसाठी शंभर तसेच मुलींसाठीदेखील शंभर निवासी क्षमतेचे वसतिगृह तातडीने सुरु करण्याच्या कार्यवाहीबाबत नियोजन विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना सूचित करावे, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.