30.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्र१६ आमदार लोकसभेच्या मैदानात

१६ आमदार लोकसभेच्या मैदानात

खासदारकीसाठी लढत, सर्वाधिक ७ आमदार कॉंग्रेसचे

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार निश्चित झाले असून तिस-या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्राचे विधिमंडळ गाजवणारे तब्बल १६ आमदार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे ७ तर महायुतीचे ७ आमदार लोकसभेच्या रिंगणात आहेत. बहुजन विकास आघाडीचा एक आणि रासपचा एक आमदार लोकसभेच्या मैदानात असून, २ आमदार विधान परिषदेचा आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि अजित पवार गट वगळता इतर पक्षातील आमदारांना मैदानात उतरविण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक ७ आमदार कॉंग्रेसचे आहेत.

राज्यात लोकसभेसाठी मैदानात असलेल्या आमदारांमध्ये कॉंग्रेसचे पुण्यातील कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून, सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून, मुंबईतील धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांना उत्तर-मध्य मुंबईतून, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूरमधून आणि दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना अमरावतीतून मैदानात उतरविण्यात आले. यासोबतच महायुतीतील भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापूर, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून, मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांना इशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.

तसेच शिंदे गटाचे मंत्री तथा पैठणचे आमदार संदीपान भउमरे यांना छत्रपती संभाजीनगरमधून, जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर यांना उत्तर-पश्चिम मुंबईतून, उमरेडचे राजू पारवे यांना रामटेकमधून, भायखळ््याच्या आमदार यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी देण्यात आली. यासोबतच विधान परिषदेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांना साता-यातून आणि पारनेरचे निलेश लंके यांना नगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

विधान परिषदेचे २ आमदार मैदानात
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे हे सातारा लोकसभेच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रीय समाज पक्षाचे विधान परिषद आमदार महादेव जानकर महायुतीचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. हे दोन आमदार विधान परिषदेचे असून, इतर आमदार विधानसभेचे आहेत. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत आमदारकीचा राजीनामा देत निलेश लंके शरद पवारांकडे आले ते अहमदनगर दक्षिण मधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR