27.9 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रसंघाशी संबंधित पोलिसाने केला करकरेंवर गोळीबार

संघाशी संबंधित पोलिसाने केला करकरेंवर गोळीबार

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत २६/११ च्या हल्ल्यात पोलिस अधिकारी हेमंत करकरे शहीद झाले. परंतु त्यांच्या शरीरात जी गोळी घुसली, ती अतिरेक्यांनी नाही, तर संघाशी संबंधित पोलिसाने हा गोळीबार केला होता, असे वादग्रस्त वक्तव्य कॉंग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यामुळे खळबळ उडाली असून, त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी हे माझे वक्तव्य नाही, तर एस. एम. मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकात तसे नमूद केलेले आहे. त्याचाच मी संदर्भ दिलेला आहे. त्यामुळे ते खरे असेल, तर देशद्रोह आहे, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर येथे आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी उत्तर-मध्यचे भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, २६/११ शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी ही कुठल्याही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित पोलिस अधिका-याच्या पिस्तुलातील होती. त्यावेळी ज्यांनी हे पुरावे लपविले, तो देशद्रोही म्हणजे अ‍ॅड. उज्ज्वल निकम. अशा देशद्रोह्याला भाजपने उमेदवारी दिली आहे, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

२६/११ च्या हल्ल्यातील एकमेव जिवंत गुन्हेगार अजमल कसाब याला फाशीची शिक्षा झाली. त्याला फासावरही लटकवण्यात आले. परंतु याचे कुणी श्रेय घेण्याची गरज नाही. एखाद्या तालुका स्तरावरील वकिलाने जरी केस लढली असती तर कसाबला फाशी झाली असती. त्यासाठी उज्वल निकम यांनी श्रेय घेण्याची आवश्यकता नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले. मात्र, त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावरच टीका होत होत आहे. वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत, अशा नेत्यांनी जबाबदारीने वक्तव्य करायला हवे. परंतु त्यांनी एका पुस्तकातील संदर्भ देत निकम यांच्यावर निशाणा साधल्याने वाद निर्माण झाला आहे.

निकम यांचा पराभव अटळ
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी उज्ज्वल निकम यांना तेव्हाच ओळखले होते, असे सांगत विजय वडेट्टीवार म्हणाले की, निकम यांच्याबद्दल जे पुस्तकात नमूद केलेले आहे आणि आम्ही जो आरोप केलेला आहे, त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. या निवडणुकीत निकम यांचा पराभव अटळ आहे, असेही ते म्हणाले.

वडेट्टीवारांची भूमिका पाकिस्तान धार्जिणी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर जशास तसे उत्तर दिले असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांच्या शरीरावर लागलेली गोळी पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब याची नव्हती, असे सांगून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांची ही भूमिका पाकधार्जिणी आहे, अशा शब्दांत हल्ला चढविला. मतांसाठी कॉंग्रेस कोणत्याही स्तराला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.

हा तर शहिदांचा अनादर
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जे आरोप केले आहेत, ते पूर्णत: निराधार असून, त्यांनी केलेल्या आरोपामुळे आपल्याला खूप वाईट वाटले. राजकारणातून आपणच आपल्या देशाची प्रतिमा मलिन करीत आहोत, हे वाईट आहे. हा तर २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांचा अनादर आहे, अशा शब्दांत उज्वल निकम यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR