24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयविषारी दारू प्यायल्याने हरियाणात १९ जणांचा मृत्यू

विषारी दारू प्यायल्याने हरियाणात १९ जणांचा मृत्यू

चंदीगड : हरियाणामध्ये विषारी दारू प्यायल्याने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये जननायक जनता पार्टीच्या (जेजेपी) नेत्याचाही समावेश आहे. यमुनानगर आणि लगतच्या अंबाला जिल्ह्यातील मांडेबारी, पणजेतो का माजरा, फुसगढ आणि सारण या गावांमध्ये बनावट दारू पिऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

यानंतर संतप्त ग्रामस्थांनी दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे विरोधी पक्ष आक्रमक झाले असून मृत्यूवरून विरोधी पक्षांनी मनोहर लाल खट्टर सरकारवर टीका केली आहे. याआधीच्या अशाच घटनांवरून हरियाणा सरकार धडा घेण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

पोलिसांनी आतापर्यंत सात संशयितांना अटक केली असून इतरांच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. मात्र, जीवाच्या भीतीमुळे गावकरी या दारू व्यावसायिकांविरुद्ध उघडपणे बोलण्यास घाबरत आहेत. आम्ही आवाज उठवला तर आमचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी भीती एका गावकऱ्याने माध्यमांपुढे व्यक्त केली आहे.
त्याच वेळी, पोलिसांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील दोन स्थलांतरित मजुरांचा गुरुवारी अंबाला येथे संशयास्पदरित्या बेकायदेशीररीत्या बनावट दारू प्यायल्याने मृत्यू झाला आहे.

विषारी दारू पिऊन मृत्यू झालेल्यांमध्ये एका ७० वर्षीय वृद्धाचाही समावेश आहे. त्यांचा मुलगा रविंदरने माध्यमांना सांगितले की, माझ्या वडिलांचा शुक्रवारी रात्री विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाला. त्यांना दारूचे व्यसन होते, पण सहसा ते फार कमी दारू प्यायचे. ते मित्रांसोबत दारू प्यायचे.

बनावट दारूचे २०० बॉक्स जप्त
अंबाला पोलिसांनी बंद कारखान्यात बनावट दारूचे २०० बॉक्स जप्त केले आहेत. पोलिसांनी अवैध दारू तयार करण्यासाठी वापरलेले १४ रिकामे ड्रम आणि साहित्यही जप्त केले. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला असून यमुनानगर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR