परभणी : जिल्ह्यातील गंगाखेड शहरातील परळी नाका परिसरातील महाराणा प्रताप चौकात गुरुवार, दि. १४ जुलै रोजी ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गंगाखेड नगर परिषदेचे २ कर्मचारी जागीच ठार झाले. या अपघातात ठार झालेल्यांची नावे संतोष साळवे आणि मुनवर(बरकत नगर, दत्तमंदिर परिसर, गंगाखेड) अशी आहेत. हे दोघेही गंगाखेड नगरपरिषदेत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकी (क्रमांक एमएच २२ एएक्स ०५७४) व ट्रक (क्रमांक एमएच ३८ एक्स ९९७७) यांची परळीनामा परिसरात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात न. प. च्या २ कर्मचा-यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच गंगाखेड पोलीसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नगरपरिषद कर्मचारी व नागरिकांनी दोन्ही दिवंगत कर्मचा-यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून गंगाखेड पोलिस अधिक तपास करत आहेत.
















