पेण : प्रतिनिधी
गणपतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणा-या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील सुमारे दोन हजार गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळांमधून गतवर्षी सुमारे सव्वा लाख गणेशमूर्ती निर्यात झाल्या होत्या. त्यामध्ये यंदा ७५ हजारांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यंदा १५ लाख गणेशमूर्तींची निर्मिती झाली असून, २ लाख गणेशमूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत.
दरम्यान, पेण येथील गणेशमूर्ती निर्मिती व्यवसायातील तिस-या पिढीचे ज्येष्ठ मूर्तिकार आणि पेण गणेशमूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, थायलंड, न्यूझिलंड, जपान या देशांमध्ये गणेशमूर्ती पाठविल्या जात होत्याच परंतु आता यूएई आणि सिंगापूरमध्ये हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने येथेही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागल्याने या देशांमध्ये गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे.
यंदाचा पेणच्या गणेशमूर्तींना जीआय मानांकन आणि गणेशमूर्ती निर्मिती व्यवसायाला उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला असल्याने यंदा परदेशात निर्यात होणा-या गणेशमूर्तींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती दिली आहे. यंदा ७ सप्टेंबर रोजी गणरायांचे आगमन होत असून गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यातील गणेशमूर्ती संपूर्ण महाराष्ट्रासह देशात व परदेशात पाठवायला यंदा सुरुवात झाली आहे.