नवी दिल्ली : भारतात दरवर्षी वीस लाखांहून अधिक लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू होतो. एका रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. भारतापेक्षा केवळ चीनमध्येच वायू प्रदूषणामुळे जास्त मृत्यू झाले आहेत. या अभ्यासातून असेही समोर आले आहे की, औद्योगिक क्षेत्र, ऊर्जा उत्पादन आणि वाहतूक इत्यादींमध्ये जीवाश्म इंधनाचा वापर जगभरात दरवर्षी ५० लाखांहून अधिक लोकांच्या मृत्यूचे कारण बनतो.
संशोधकांनी म्हटले आहे की, २०१९ मध्ये केलेल्या मूल्यांकनानुसार, वायू प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी ८३ लाख लोकांचा मृत्यू होतो. अशा परिस्थितीत, जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे होणारे मृत्यू हे एकूण मृत्यूंपैकी ६१ टक्के आहेत जे स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेच्या वापरामुळे टाळता येऊ शकतात. संशोधकांना असेही आढळून आले की, सुमारे ५२ टक्के मृत्यू इस्केमिक हृदयरोग, स्ट्रोक, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज आणि मधुमेह यासारख्या सामान्य परिस्थितींशी संबंधित आहेत. तसेच, सुमारे २० टक्के मृत्यूची प्रकरणे उच्च रक्तदाब, अल्झायमर आणि पार्किन्सन रोग यांसारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह विकारांशी संबंधित आहेत.
संशोधकांचा असा विश्वास आहे की, जीवाश्म इंधनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेले देश त्यांचा वापर टाळून दरवर्षी सुमारे ४.६ लाख मृत्यू टाळू शकतात. तसेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेली सीओपी २८ हवामान बदलाची चर्चा, जीवाश्म इंधन टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या दिशेने बर्याच प्रमाणात प्रभावी ठरू शकते. जगभरात असे मार्ग शोधले जात आहेत जेणेकरून जीवाश्म इंधन कमीत कमी वापरला जाईल.