22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूर३३ लाखांची फसवणूक; बिहारच्या आरोपीस अटक

३३ लाखांची फसवणूक; बिहारच्या आरोपीस अटक

सोलापूर – बँक व्यवस्थापकाचा विश्वास संपादन करून ३३ लाखांची ऑनलाइन फसवणूक करणारा आरोपी ऋत्विक वर्मा (रा. पोखारा, बेतिया, वेस्ट चंपारण्य, बिहार) यास सदर बझार पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. फिर्यादी हे बँक व्यवस्थापक असून ते २५ मे २०२३ रोजी बँकेत काम करीत असताना, अनोळखी मोवाइल धारक ९७५२१०४५१८ क्रमांकावरून फिर्यादीच्या मोबाइलवर फोन करून, मी आहेरकर ऑटोमोबाईल्सचा मालक राजेश आहेरकर बोलत आहे असे सांगून, सुरुवातीला मला आपल्या शाखेत मुदत ठेव म्हणून २ करोडच्यावर रक्कम ठेवायची आहे, असे बोलून फिर्यादीकडून व्याजदाराची माहिती घेतली.

बोलताबोलता त्याने आहेरकर ऑटोमोबाईल्सच्या बँक खात्याची माहिती फिर्यादीच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून तत्काळ एनईएफटी करावयाची आहे असे सांगून, त्याकरिता खात्याच्या माहितीचे आहेरकर ऑटोमोबाईल्सच्या नावाने बनावट लेटरपॅड बनवून, बनावट मेल आयडीवरून पाठवून त्यामध्ये बनावट खाते क्रमांक व वेगवेगळ्या रकमेचे आकडे नमूद करून, एकूण ३३ लाख ७ हजार ५५० इतकी रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगितली. त्यामुळे फिर्यादीने ती रक्कम ट्रान्स्फर केली. आरोपीने फसवणूक केल्याबद्दल सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून संशयित मोबाइल क्रमांकाची सायबर विभागाकडून तसेच बनावट बँक खात्याची संबंधित बँकेकडून माहिती घेऊन अवलोकन करुन, त्यातून मिळणारे ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक, केवायसी तसेच इतर तपासाच्या दृष्टीने आवश्यक माहिती घेऊन आरोपीचा शोध सुरू केला. आरोपींनी गुन्हा करताना बिहार, उत्तर प्रदेश, नोएडा, गाझीयाबाद, दिल्ली येथील संशयित लोकांचे बँक खाते वापरल्याचे निष्पन्न झाले, तसेच आरोपींनी या गुन्हयात एकूण २५ बँक खाते, ४६ वेगवेगळ्या कंपनीचे सीमकार्ड, ३४ मोबाइलचे आयएमईआय क्रमांक वापरल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचप्रमाणे सदर गुन्हयातील फसवणुकीची रक्कमही वेगवेगळ्या राज्यातून एटीएमद्वारे काढली गेली.

त्यानुसार सदर ठिकाणचे एटीएम सेंटरचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्यावरून आरोपींचा शोध घेऊन आरोपी ऋत्विक वर्मा यास शिताफीने अटक केली. त्याच्याकडून फसवणूक रकमेपैकी सात लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी, पोलीस अंमलदार राजू चव्हाण, कृष्णात जाधव, सोमनाथ सुरवसे यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR