मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबनातून सूट दिल्यानंतर शुक्रवारी ते विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी झाले आहेत. सभागृहात जाण्यापूर्वी यांनी नागपूरमध्ये झालेल्या एका घोटाळ्याला वाचा फोडली.
अंबादास दानवे म्हणाले की, मी तीन दिवसांच्या गॅपनंतर पुन्हा आलो आहे. काल एक घटना नागपूरची समोर आली. यामध्ये तब्बल १४ हजार शेतक-यांचा सातबारा वापरला आणि नाव बदलून १४ हजार शेतक-यांच्या नावावरील नुकसान भरपाई तलाठी आणि अधिका-यांनी लुबाडली. ही रक्कम ३४ कोटी रुपये असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.
दानवे पुढे म्हणाले की, तलाठ्यापासून ते तहसीलदारांपर्यंत सगळेच या अपहारामध्ये सहभागी आहेत. शेतक-यांच्या तोंडातला घास हिरावून घेण्याचे पाप केले जात आहे. विशेष म्हणजे फडणवीस, बावनकुळे आणि गडकरी असूनही अशा घटना घडत आहेत. त्यामुळे सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे असे दानवे म्हणाले. स्वत:वरील कारवाईवरुन बोलताना दानवे म्हणाले की, माझ्यावर अन्याय केलेला आहे, विरोधी पक्षनेत्याविना सभागृह चालवणे चुकीचे आहे. मलाच जबाबदार धरले गेले आणि कारवाई केली. जसा पूल कोसळला तसे हे सरकार हे कोसळेल, जी काही विकासाची कामं सुरुयत, ती स्वत:ला समृद्ध करण्यासाठी आहेत, असा आरोप त्यांनी सत्तापक्षावर ठेवला.