26.7 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeमहाराष्ट्र४ जहाल महिला नक्षलवादी ठार

४ जहाल महिला नक्षलवादी ठार

पोलिस-नक्षल चकमक ६२ लाख रुपयांचे होते बक्षीस

गोंदिया : हॉकफोर्स, पोलिस आणि नलक्षवादी यांच्या झालेल्या चकमकीत चार जहाल महिला नक्षलवादी ठार झाल्याची घटना बुधवार दि. १९ फेब्रुवारी रोजी घडली. चकमकीत ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांवर ६२ लाख रुपयांचे बक्षीस होते. चकमकीत ठार झालेल्या चारही महिला नक्षलवाद्यांची ओळख पटली असल्याची माहिती बालाघाट झोनचे पोलिस महासंचालक संजय सिंह यांनी गुरुवार दि. २० फेब्रुवारी रोजी बालाघाट येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

चकमकीत ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांमध्ये आशा कान्हा भोरमदेव (एरिया कमेटी कमांडर), शीला, रंजीता, लख्खे कान्हा भोरमदेव आदींचा समावेश होता. या सर्वांवर विविध नक्षली कारवाई प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या चारही महिला नक्षलवादी छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पुढे आले आहे. या चकमकीची माहिती देताना पोलिस महासंचालक संजय सिंह यांनी सांगितले गढी सूपखार वन परिक्षेत्रातील रौंदा फॉरेस्ट कॅम्पजवळ १९ फेब्रुवारी रोजी ही चकमक झाली. या चकमकीत काही नक्षलवादी ठार झाले. तर काही नक्षलवादी पळून गेले. या जंगलात हॉकफोर्स, पोलिस विभागाचे १२ पथकातील जवळपास ५०० जवानांचा समावेश होता. यात चार महिला नक्षलवादी ठार झाल्या तर काही नक्षलवादी जखमी झाले असून ते घनदाट जंगलाचा आधार घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.

कशी झाली चकमक?
बालाघाटचे पोलिस अधीक्षक नागेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की नक्षल कमांडर आशा ही लगतच्या छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहे. मध्यप्रदेशच्या मंडला येथे कान्हा व्याघ्र प्रकल्प व छत्तीसगड राज्यातील कवर्धा जिल्ह्यातील भोरमदेव वन्यजीव अभयारण्य ती एका नक्षल दलमचे नेतृत्व करीत होती. या दलमला ‘केबी’ असे म्हटले जात होते. ती १९ फेब्रुवारी रोजी सूपखार वन परिक्षेत्रातील रौंदा फॉरेस्ट परिसरात आपल्या १० ते १५ साथीदारांसह शस्त्र घेऊन आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारावर हॉकफोर्स व जिल्हा पोलिस दलाला या परिसरात सर्च ऑपरेशन करण्यासाठी पाठविण्यात आले होते.

रौंदा फारेस्ट कॅम्प परिसरात चकमक
गढी सूपखार वन परीक्षेत्रातील रौंदा फारेस्ट कॅम्प परिसरात सर्चिंग करीत असलेल्या जवानावर नक्षलवाद्यांनी अचानक फायरिंग सुरु केली. हॉकफोर्सच्या जवानांनी नक्षलवाद्यांना आत्मसर्मपण करण्याचे आवाहन केले. मात्र नक्षलवाद्यांनी पोलिस जवानाच्या दिशेने सातत्याने फायरिंग सुरुच ठेवली. यानंतर यानंतर हॉकफोर्स व पोलिसांनी याला प्रत्युत्तर फायरिंग केली. यात चकमकीत चार जहाल महिला नलक्षवादी ठार झाल्या.

नक्षलवाद्यांकडून ही शस्त्रे केली जप्त
हॉकफोर्स व पोलिस जवानांनी नक्षलवाद्यांजवळून एक इन्सास रायफल, एक एसएलआर रायफल, एक ३०३ रायफल व दैनदिन उपयोगाच्या वस्तू जप्त केल्या. ही मोहीम राबविणा-या हॉकफोर्स व पोलिस जवानांचे पोलिस महासंचालक व पोलिस अधीक्षक यांनी कौतुक केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR