चेन्नई : बंगालच्या उपसागरातून उगम पावलेले फेंगल वादळ शनिवारी संध्याकाळपर्यंत पुद्दुचेरीतील कराईकल आणि तामिळनाडूतील महाबलीपुरम दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्याचा परिणाम कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही दिसून येत आहे.
तामिळनाडूत ९० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील असा इशार देण्यात आला आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अनेक भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चेन्नईत मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. येथील एका एटीएमजवळ शॉर्टसर्किट होऊन विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला आहे. या जिल्ह्यांतील लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या ७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये ३० सैनिक आहेत.
अनेक शहरांवर परिणाम
शहरातील अनेक उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. अनेक गाड्याही नियोजित वेळेपासून उशिराने धावत आहेत. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील कांचीपुरम, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, कुड्डालोर, विल्लूपुरम, कल्लाकुरिची, चेन्नई आणि मायिलादुथुराई जिल्ह्यात आज शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.