मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटून गेले असले तरी अद्याप महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. दुसरीकडे मोठा जनाधार मिळूनही महायुती सत्तास्थापनेसाठी करत असलेला उशीर राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान शनिवार दि. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर येत्या ५ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा भव्य शपथग्रहन सोहळा असल्याची अधिकृत माहिती दिली.
बावनकुळे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करीत सदर शपथविधी सोहळयाची घोषणा केली आहे. या पोस्टमधून बावनकुळे यांनी शपथविधी सोहळ्याविषयी माहिती दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
मुख्यमंत्र्यांवर गुढ कायम
महायुतीला जनतेने प्रचंड यश दिले. न भूतो असा विजय महायुतीचा झाला. तर, महाविकास आघाडीला जनतेने सपशेल नाकारले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता जवळपास आठवडा आला, तरी महायुतीचे सरकार कधी स्थापन होणार, याबाबत स्पष्टता येत नव्हती. परंतु, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ट्विटने यावरील अनिश्चिततेचे मळभ दूर केले आहे. असे असले तरी मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण असणार, महायुतीतील किती आमदार शपथ घेणार, मंत्रिमंडळात कोण असणार, खातेवाटप कसे होणार, यांसारख्या अनेक प्रश्नांवर सस्पेन्स कायम आहे.