पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कंपनीत गॅस गळती झाल्यानं चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर दोन जण बेशुद्ध आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील मेडली फार्मासिटीकल कंपनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे, तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नंबर एफ १३ मध्ये ही कंपनी आहे. आज दुपारी अडीच ते तीन दरम्यान ही घटना घडली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की पालघर जिल्ह्यातल्या तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नंबर एफ १३ मध्ये मेडली फार्मासिटीकल कंपनी आहे, या कंपनीमध्ये ही दुर्घटना घडली. वायू गळतीमुळे ६ कामगार बेशुद्ध झाले होते, त्यातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर दोन जणांना तातडीने येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज दुपारी अडीच ते तीन वाजेदरम्यान ही घटना घडली आहे, दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला, वायु गळतीचे नेमके कारण काय आहे? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
मेडली फार्मा या कंपनीमध्ये असलेल्या नायट्रोजन रिएक्शन टँकमध्ये गॅस गळती झाल्याने हा अपघात घडला आहे. या दुर्दैवी घटनेत सहा व्यक्ती बेशुद्ध झाल्या होत्या, त्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून दोघांची परिस्थिती गंभीर आहे, त्यांना अतिदक्षता विभागातमध्ये भरती करण्यात आलेले आहे. कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव असे या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांचे नाव आहे, तर रोहन शिंदे आणि निलेश हाडळ असे या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींची नाव आहेत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
गॅस गळतीचे कारण अस्पष्ट
दरम्यान ही गॅस गळती नेमकी कशी झाली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.