लातूर : प्रतिनिधी
श्री क्षेत्र आश्विनी तुळजापूर यात्रेसाठी लातूर जिल्हयातून दरवर्षि भाविक भक्त मोठया प्रमाणात दर्शनासाठी जातात. दर्शनासाठी जाणा-या प्रवाशांच्या प्रवासाची सोय व्हावी म्हणून एसटी महामंडळाच्या लातूर विभागाच्यावतीने यावर्षी १३० बसेसची सोय करण्यात आली होती. लातूर विभागाला श्री क्षेत्र आश्विनी तुळजापूर यात्रेतून सवलत सोडून नगदी ३९ लाख ९८ हजार ६०० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या यात्रेसाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
श्री क्षेत्र तुळजापूर येथे दरवर्षी नवरात्र दसरा महोत्सवानिमित्त यावर्षी ११ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत यात्रा पार पडली. या यात्रेचे मुख्य दिवस रविवार दि. १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना, सोमवार दि. २३ ऑक्टोबर या दिवशी महानवमी, मंगळवार दि. २४ ऑक्टोबर विजया दशमी, शनिवार दि. २८ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा असे होते. या कालावधीत लातूर जिल्हयातून यात्रेसाठी मोठया प्रमाणात भाविक-भक्त दर्शनासाठी जातात. सदर यात्रा दि. ३१ ऑक्टोबर पर्यंत चालली. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाच्या लातूरच्या विभागीय कार्यालयाने पाच आगारातील १३० बसेसची सोय केली होती. यामध्ये लातूर आगारातून ४१ बसेस, उदगीर आगारातून २१, अहमदपूर आगारातून २१, निलंगा आगारातून २१, औसा आगारातून २६ बसेसचे नियोजन करण्यात आले होते.
तुळजापूर यात्रा कालावधीत घटस्थापनेपासून ते पौर्णिमापर्यंत १३० बसेसनी १ हजार १६८ फे-या मारून १ लाख ६२ हजार ३८७ किलो मिटर अंतर पार करत सवलत सोडून नगदी ३९ लाख ९८ हजार ६०० रूपयांचे उत्पन्न मिळवले आहे. यात सार्वाधिक उत्पन्न हे निलंगा आगाराने ११ लाख ३१ हजार ३२७ रूपये मिळवले. त्या खालेखाल उदगीर आगाराने ९ लाख ६२ हजार ४६१ रूपये, लातूर आगाराने ७ लाख ३२ हजार ३९७ रूपये, औसा आगाराने ६ लाख ८९ हजार १०७ रूपये, तर अहमदपूर आगाराने ४ लाख ८३ हजार ३०८ रूपयांचे उत्पन्न कामावले आहे.