19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयदेशात ४० टक्के लोकांना प्रदूषणाचा फटका!

देशात ४० टक्के लोकांना प्रदूषणाचा फटका!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक शहरात वायू प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. सोमवारी पंजाबपासून ते बंगालपर्यंत देशातील ४० टक्के लोकसंख्येला याचा फटका बसत आहे. उत्तर भारतात अमृतसरपासून ते पूर्व बंगालमधील आसनसोलपर्यंत हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे प्रदूषणाची समस्या अधिक चिंता वाढविणारी ठरत आहे. यावरून आता विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

सॅटेलाईट इमेजमध्ये गंगेच्या संपूर्ण मैदानी प्रदेशाला लागून शहरांमध्ये हानिकारक धुके पाहायला मिळाले तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४२१ पर्यंत पोहोचला होता तर राजस्थानच्या भिवाडी येथे हा आकडा ४३३ पर्यंत गेला होता. पंजाबच्या अमृतसर येथे ३१२, फरीदाबाद येथे ४१२, गाझियाबाद मध्ये ३९१, लखनौमध्ये २५१, पाटणा २६५, आसनसोलमध्ये २१५ आणि धनबादमध्ये २५५ एक्यूआय मोजण्यात आला.
महत्वाची बाब म्हणजे ५० पर्यंत एक्यूआय हा आरोग्यासाठी योग्य मानला जातो. मात्र तो १५१ ते २०० पर्यंत एक्यूआय हा मध्यम खराब तर ३०१ ते ४०० अत्यंत खराब आणि ४०१ हून अधिक एक्यूआय अत्यंत गंभीर मानला जातो. त्यादृष्टीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. परंतु प्रदूषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, ही समस्या गंभीर होत चालली आहे. अशा स्थितीत सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. परंतु अजूनही त्याबाबतीत फारसा विचार होताना दिसत नाही. त्यामुळे याची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

राजधानी दिल्लीतही प्रदूषणाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. त्यामुळे सोमवारी दिल्लीतील एक्यूआयमध्ये अंशत: सुधारणा झाली, परंतु हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत राहिली. एक्यूआय रविवारी ४५४ होता, जो सोमवारी ४२१ होता. दिल्ली सरकारने १३ ते २० नोव्हेंबर दरम्यान सम-विषम नियम लागू करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार सोमवारी दिल्लीतील बहुतेक भागांचा एक्यूआय अत्यंत खराब किंवा गंभीर श्रेणीत राहिला.

महाराष्ट्र, गुजरात, त्रिपुरात हवा बिघडली
हिवाळा येताच हवेची गुणवत्ता बिघडू लागते. इशान्येतील आसाममधील बिरनिहाट आणि त्रिपुरातील आगरतळापर्यंत या हानिकारक धुक्यामुळे लोकांना त्रास होत आहे. सोमवारी बिरनिहाटमध्ये एक्यूआय २९३ आणि आगरतळामध्ये २२४ होता. मध्य, पश्चिम आणि पूर्व भारतातील नागरिकदेखील खराब हवेमुळे त्रस्त आहेत. यामध्ये मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर (२८६), महाराष्ट्रातील नवी मुंबई (२६१) आणि उल्हासनगर (२६९), गुजरातमधील अंकलेश्वर (२१६) आणि ओडिशातील अंगुल (२४२) यांचा समावेश आहे.

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR