37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeराष्ट्रीयछत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात ७१ टक्के मतदान

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात ७१ टक्के मतदान

रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान मंगळवारी सायंकाळी ५ वाजता संपले. पहिल्या टप्प्यात ७१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या २० विधानसभा मतदारसंघांपैकी १० जागांवर सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि उर्वरित १० जागांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात राज्यातील २० विधानसभा जागांसाठी मंगळवारी पोलीस आणि निमलष्करी दलाच्या कडेकोट बंदोबस्तात मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत या जागांसाठी एकूण ४०,७८,६८१ मतदारांपैकी ७१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच अनेक मतदान केंद्रांवरून अंतिम आकडे अद्याप आले नसल्याने हा आकडा वाढू शकतो, असे ते म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ६०.९२ टक्के मतदान झाले आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७१ टक्के मतदान झाले. आज झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी २५,२४९ मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले होते. नक्षलवाद्यांनी राज्यातील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला. सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत चार सुरक्षा कर्मचारी जखमी झाले असून जिल्ह्यातील तोंडामार्का कॅम्पजवळ नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात एक सीआरपीएफ कमांडो जखमी झाला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणपूर, विजापूर आणि कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबारही झाला. या घटनांमध्ये सुरक्षा दलांना कोणतीही हानी झाली नाही. निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, मतदानादरम्यान, बस्तर विभागातील १२६ गावांतील रहिवाशांनी आनंद व्यक्त केला कारण स्वातंत्र्यानंतर प्रथमच त्यांच्या गावात मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR