बीजिंग : उत्तर-पश्चिम चीनमध्ये झालेल्या भूकंपात १११ जणांचा मृत्यू झाला असून २२० जण जखमी झाले आहेत. चीनच्या सरकारी माध्यमांनी ही माहिती दिली आहे. चीनच्या गान्सू प्रांताला सोमवारी मध्यरात्री भूकंपाचा धक्का बसला, त्यामुळे तिथल्या आणि जवळच्या किंघाई प्रांतात अनेक इमारती कोसळल्या. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (युएसजीएस) ने म्हटले आहे की भूकंपाची तीव्रता ५.९ आणि खोली १० किलोमीटर होती.
मंगळवारी सकाळपासून येथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. चीनच्या सरकारने एक बचाव पथक पाठवले आहे. हे बचाव पथक स्थानिक बचाव पथकाला मदत करत आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या गांसूमध्ये ८६ लोक ठार आणि ९६ जखमी झाले तर किंघाईमध्ये नऊ लोक ठार आणि १२४ जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून व्हीडीओ फुटेज समोर आले आहे ज्यामध्ये बचाव कर्मचारी कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यातून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या भागातील वीज आणि पाणीपुरवठाही खंडित झाला आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये चीनच्या सिचुआन प्रांतात ६.६ तीव्रतेच्या भूकंपात ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.