नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाजपने दिल्लीत तब्बल २७ वर्षांनंतर विजय मिळवल्यानंतर राष्ट्रीय राजधानीच्या विधानसभेतील नवे मुख्यमंत्री कोण होणार, याबाबतच्या चर्चांना शनिवारी दुपारपासून उधाण आले. ती उत्कंठा संपण्यासाठी काही तासांपासून किमान १० दिवसांची प्रतीक्षा करावी लागू शकते. खुद्द केजरीवाल यांना आसमान दाखवणारे प्रवेश वर्मा यांच्यासारखे परिचित व उत्तमनगरचे नवे आमदार आणि संघप्रचारक पवन शर्मा यांच्यासारखे अपरिचित असे दोन्ही प्रकारांतील चेहरे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.
महिला, जाट-गुज्जर-पंजाबी किंवा पूर्वांचली आदी समुदायातून दिल्लीचे पुढचे मुख्यमंत्री होणार असतील तर त्यासाठी प्रवेश वर्मा, वीरेंद्र सचदेव, मनजिंदरसिंग सिरसा, विजेंद्र गुप्ता, खासदार मनोज तिवारी व बासुरी स्वराज ही नावे जोरदार चर्चेत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौ-यावर जात आहेत. हा दौरा आटोपून परतल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रवेश वर्मा हे माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे पुत्र आहेत. त्यांनी खुद्द केजरीवाल यांच्या विरोधात विजय मिळविल्याने ‘जायंट किलर’ ठरले आहेत.
जाट समुदायातून येणारे ४७ वर्षीय वर्मा मुख्यमंत्री झाले तर भाजपची लोकप्रियता दिल्लीसह उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमध्येही वाढू शकते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले सचदेव पंजाबी लॉबीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याही नावाची चर्चा आहे. यासोबतच दिल्ली गुरुद्वारा व्यवस्थापन समितीवर पकड असलेले ५२ वर्षीय मनजिंदरसिंग सिरसा, माजी प्रदेशाध्यक्ष विजेंद्र गुप्ता, खा. बासुरी स्वराज आणि मनोज तिवारी या दोन खासदारांची नावेही आघाडीवर आहेत.