पाटणा : बिहारच्या सीतामढीमध्ये विषारी दारू प्यायल्याने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी सर्वांनी मिळून दारू प्यायल्याचे मृतांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. शुक्रवारी सकाळपासून सर्वांची प्रकृती ढासळू लागली. उपचारादरम्यान एक-एक करून सर्वांचा मृत्यू झाला. त्यापैकी शुक्रवारी तीन आणि शनिवारी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तीन गावांमध्ये हे मृत्यू झाले असून तिन्ही गावे जवळ आहेत. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत केवळ तीन जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
सीतामढीचे एसपी मनोज तिवारी यांनी माध्यमांना सांगितले की, ३ जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण संशयास्पद असून त्याची सध्या चौकशी सुरू आहे. स्थानिक लोकांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री तीन जणांचा मृत्यू झाला होता, त्यांचे अंतिम संस्कारही करण्यात आले आहेत. इतर तिघांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. मात्र, केवळ तीन जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्यानंतर बाजपट्टी पोलीस ठाणे, पुपरी एसडीपीओ आणि इतर पोलीस दल एसपींसोबत तळ ठोकून आहेत.
ग्रामस्थांनी सांगितले की, गुरुवारी सायंकाळी सर्वजण एकत्र दारू पिण्यासाठी गेले होते. यानंतर सर्वांची प्रकृती खालावली. सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कुमार यांनी सांगितले की, सीतामढीचे पोलीस अधीक्षक मनोज तिवारी यांच्या नेतृत्वाखाली या भागात छापा टाकण्यात आला असून अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. कुमार यांच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेल्या लोकांकडून काही साहित्यही जप्त करण्यात आले आहे.