28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयमध्य प्रदेशात ७१.३२ तर छत्तीसगडमध्ये ७० टक्के मतदान

मध्य प्रदेशात ७१.३२ तर छत्तीसगडमध्ये ७० टक्के मतदान

उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद ३ डिसेंबरला मतमोजणी

भोपाळ/ रायपूर : मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे मतदान शुक्रवार दि. १७ नोव्हेंबर रोजी पार पडले असून मध्य प्रदेशात ७१.३२ टक्के तर छत्तीसगडमध्ये ७० टक्के मतदान झाले आहे. दरम्यान या दोन्ही राज्यांतील मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.

मध्य प्रदेशातील सर्व २३० विधानसभा जागांवर निवडणूक लढविणा-या २५३३ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी ६ वाजता संपले. मात्र, जे मतदार संध्याकाळी ६ वाजेपूर्वी मतदान केंद्रावर दाखल झाले असतील त्यांना मतदान करता येणार आहे. बालाघाट जिल्ह्यातील बैहार, लांजी आणि परसवाडा या तीन नक्षलग्रस्त जागांवर दुपारी ३ वाजता मतदान संपले. मंडला जिल्ह्यातील ५५ नक्षलग्रस्त मतदान केंद्र आणि दिंडोरी येथील ४० मतदान केंद्रांवरही दुपारी ३ वाजता मतदान थांबले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात ७१.३२ टक्के मतदान झाले. आगर माळवा जिल्ह्यात सर्वांधिक ८२ टक्के मतदान झाले. अलिराजपूर जिल्ह्यात सर्वात कमी ५६.२४% मतदान झाले. रतलाम जिल्ह्यातील सैलाना मतदारसंघात सर्वाधिक ८५.४९ टक्के मतदान झाले. भिंड मतदारसंघात सर्वात कमी ५०.४१% मतदान झाले.

छत्तीसगडमध्ये गालबोट
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील ७० जागांवर मतदान संध्याकाळी ५ वाजता संपले. आता बूथच्या आत उरलेल्यांनाच मतदान करता येणार आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६८.१५ टक्के मतदान झाले. रायपूरमध्ये सर्वात कमी ५८.८३% मतदान झाले. मतदान संपल्यानंतर नक्षलग्रस्त गरीबीबंदच्या बिंद्रनवगढमध्ये नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. यामध्ये आयटीबीपीचे जवान जोगिंदर सिंग शहीद झाले आहेत.

मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, छत्तीसगडचे अभिनंदन! तुम्ही सर्वांनी तुमचा विजय निश्चित केला आहे. जे उरले आहेत त्यांना मतदान करायला सांगा. आता विजयाचे अंतर वाढवावे लागेल. फक्त थोडे अधिक ताकद आणि आम्ही २०१८ मध्ये एक मोठा विजय आणत आहोत. रमण सिंह म्हणाले की, अडीच वर्षांचे मुंगेरीलाल हे दोघेही मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहत असल्याचे ऐकले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR