30.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयआम्हा भीती कोणाची ?

आम्हा भीती कोणाची ?

दीपोत्सवाचा आनंदोत्सव पार पडला. सारे काही पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या घडले’ दिवाळीच्या दिवसांत प्रदूषणात वाढ होईल म्हणून अनेक इशारे देण्यात आले होते, आवाहन करण्यात आले होते. आदेश देण्यात आले होते परंतु अशा इशा-यांना, आवाहनांना आणि आदेशांना आम्ही मुळीच दाद देत नाही. मुळात आम्ही नव्या दमाचे शिपाई आहोत, आम्ही कोणालाच भीत नाहीत, समाजाला-सत्ताधा-यांना नि न्यायालयालासुद्धा! वाढत्या प्रदूषणामुळे सारे जग चिंतेत असेल पण आम्हाला कसली चिंता? न्यायालयाने कितीही घसा फोडून सांगितले. तरी प्रदूषणाला अखेर आवाजाची साथ मिळालीच! वायुप्रदूषणामुळे आधीच आजारी असलेल्या दिल्लीच्या चिंतेत दिवाळीत आणखी भर पडली. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मर्यादित स्वरूपात फटाके फोडण्याला परवानगी दिली असताना न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून दिल्लीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

त्यामुळे दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक तब्बल ९६९ इतका अत्यंत घातक पातळीवर गेला होता. स्वीस ग्रुपने जाहीर केलेल्या जगातील सर्वांधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली अव्वल स्थानी आहे. देशातील मुंबई आणि कोलकाता या शहरांचाही जगातील सर्वांधिक प्रदूषित शहरांच्या यादीत पहिल्या दहा क्रमांकामध्ये समावेश आहे. गत काही दिवसांपासून दिल्लीची हवा वरचेवर बिघडत चालली आहे. त्यापाठोपाठ मुंबईतही वायुप्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्याचीही योजना आखण्यात आली होती पण अशा प्रयत्नांना जनतेची साथ मिळत नसेल तर काय उपयोग? दिवाळीपूर्वी प्रदूषणात घट नोंदविली गेली होती परंतु ऐन दिवाळीत झालेल्या आतषबाजीमुळे वायुप्र्रदूषणात पुन्हा एकदा वाढ झाली. पर्यावरण आणि मानवी आरोग्याच्या संदर्भात रोजच्या हवेच्या गुणवत्तेची नोंद करण्यासाठी हवा गुणवत्ता निर्देशांक वापरला जातो. ० ते ५० हवा गुणवत्ता निर्देशांक असलेली शहरे वायुप्रदूषित नसतात. ५१ ते १०० मध्यम धोकादायक तर १०१ वरील सर्व शहरे धोकादायक मानली जातात. १०१ वर हवेचा गुणवत्ता निर्देशांक असेल तर त्या शहरातील लोकांना श्वसनासंबंधी आजार जडण्याची शक्यता असते.

स्वीस गु्रपच्या सर्व्हेनुसार मेक्सिको सिटीला जगातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून शंभराव्या स्थानावर घोषित करण्यात आले आहे. मुंबईत धूळ आणि धुरामुळे हवा प्रदूषित झालेली असतानाच आवाजामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला गेला. रविवारी लक्ष्मीपूजनानिमित्त फटाके वाजविल्याने धुराबरोबरच आवाजाचे प्रदूषण ११७ डेसिबल या धोकादायक पातळीच्या वर पोहोचले होते. गतवर्षी याच आवाजाची पातळी १०९ डेसिबल इतकी होती, असे आवाज फाऊंडेशनने म्हटले आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबई शहराच्या विविध भागांत फटाके वाजविण्यात आले. न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेत फटाके उडविण्याची मर्यादा आखून दिली होती परंतु अनेकांनी रात्री १० वाजल्यानंतरही फटाके वाजविले. राज्यातील अन्य छोट्या-मोठ्या शहरांत हीच स्थिती होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विषारी रसायने असलेल्या कोणत्याही फटाक्यांना परवानगी नसली तरी रासायनिक विश्लेषणादरम्यान ही रसायने आढळली. त्यात सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेल्या बेरियम या रसायनाचा समावेश होता. त्यामुळे हवेत घातक रसायने पसरली. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईची हवा खराब झाली आणि प्रदूषणात वाढ झाली.

अनेक ठिकाणी कचरा, शेकोटी पेटविण्यावर बंदी घालण्यात आली परंतु या बंदीचे पालन होताना दिसले नाही. हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत जाऊन मुंबईने दिल्लीला मागे टाकले. मुंबईतील प्रदूषित होत चाललेली हवा आणि प्रदूषण यामुळे प्रशासनाला नागरिकांची काळजी वाटू लागली आहे. घराच्या खिडक्या बंद ठेवण्याचे आवाहन मनपाने लोकान्ाां केले आहे परंतु छोट्या छोट्या गल्लीतील खोल्यांतून राहणा-या लोकांनी काय करायचे? त्यांना खिडक्या बंद ठेवून कसे चालेल? वायू, पाणी आणि ध्वनिप्रदूषण त्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहणारी आहे. मुंबईतील मोठ्या लोकसंख्येला प्रदूषण, खराब हवा याचे भय मुठीत घेऊनच जगावे लागते. त्यांचे भय संपणार तरी कसे? दूषित वातावरणावर मात करण्यासाठी सरकारने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. दूषित हवा ओकणा-या मोठ्या वाहनांच्या संख्येवर बंदी घालावी लागेल.

कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी वातावरण दूषित करणा-या नागरिकांवर कठोर कारवाई करावी लागेल. बांधकाम करणा-यांवर काही काळ बंदी घालावी लागेल. दूषित वातावरणावर मात करायची असेल तर शासन, प्रशासन आणि जनतेने एकमेकाला साहाय्य केले तरच प्रदूषण रोखता येऊ शकेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात पोलिस यंत्रणा किती यशस्वी झाली हा संशोधनाचा विषय ठरू शकेल. कायद्याची अंमलबजावणी ज्यांनी करायची त्यांनी हा विषय गांभीर्याने न घेतल्याने दिवस-रात्र फटाके फुटतच होते. मुंबई शहरासारखी स्थिती राज्यातील अन्य शहरांमध्येही होती. दिवाळीत राज्यात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. दिवाळी पहाट कार्यक्रम सुरू असताना एका बंदिस्त हॉलमध्ये फटाके लावले गेल्याने आग लागली. मोठे फटाके मोकळ्या जागी लावायचे असतात याचे भानही लोकांना राहिले नाही. मालेगावात तर सिनेमागृहातच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या प्रकारामुळे इतर प्रेक्षकांचा जीव धोक्यात आला होता.

सार्वजनिक उत्सव, मिरवणुकांमध्ये डीजे वाजविण्यासाठी, ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी न्यायालयाने मर्यादा घालून दिलेल्या आहेत परंतु उन्मादालाच आनंद मानणारे काही बेजबाबदार नागरिक न्यायालयाच्या मर्यादा पाळत नाहीत. दिवाळीत या गोष्टींचा पुरेपूर अनुभव आला. न्यायालयाने आदेश देऊनसुद्धा बेफिकिरीने वागत असलेल्या लोकांच्या मनात पर्यावरण प्रेम विकसित होण्यासाठी विशेष समुपदेशक नेमण्याची वेळ आली आहे काय, असाही विचार मनात येतो. बेजबाबदारपणे घडणा-या घटनांमागे कोणाचा हात आहे का, अशी शंकाही मनात येते. जगभरात हवामान बदलाचे संकट अधिक गडद झाले आहे. कडाक्याची थंडी, कडक उन्हाळा, ढगफुटीसारख्या संकटाची तीव्रता वाढली आहे. वायुप्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणस्रेही उपाययोजना राबविण्याची गरज आहे. सरकारमार्फत राबविण्यात येणा-या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत ढिसाळपणा जाणवत आहे. त्यामुळे सा-यांच्याच मेहनतीवर पाणी फेरले जात आहे. कोणालाच कोणाची भीती राहिलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR