लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र डाटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य हि संघटना कोरोना महामारीच्या काळापासून ते आजपर्यंत कार्यरत असणा-या महाराष्ट्रातील आरोग्य विभागात डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे प्रतिनिधीत्व करणारी संघटना आहे. संघटनेच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये परसरलेल्या असून महाराष्ट्रात आरोग्य विभागात काम करणारे जवळपास ४ हजार डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटनेशी जुळलेले आहेत. या डाटा एन्ट्री कर्मचा-यांना प्रशिक्षण कालावधी पूर्ण न करताच कामावरुन कमी करण्याचा निर्णय यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, पुणे या कंपनीने घेतल्यामुळे लातूर जिल्ह्यातील ७५ डाटा एन्ट्री ऑपरेटर्स बेरोजगार होणार आहेत.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील डाटा एन्ट्री ओपरेटर्स यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. संपूर्ण देशात कोविड- १९ विषाणूचा प्रादुर्भाव पसरला असतांना डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी आरोग्य विभागात कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदावर स्वत:च्या व परिवाराच्या जिवाची पर्वा न करता वैद्यकिय क्षेत्रात वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या खांद्याला खांदा लावून कोविड लसिकरणापासून ते कोविड टेस्टींगपर्यंतच्या सर्व ऑनलाईन एन्ट्री बाबतच्या जबबदा-या पार पाडल्या. डाटा एन्ट्री कर्मचा-यांनी जिल्हाधिकारी लातूर, मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. लातूर, जिल्हा आरोग्यधिकारी यांच्याकडे निवेदन देवून डाटा कर्मचा-यांना प्रशिक्षण कालावधी पुर्ण करण्याची संधी द्यावी व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समाविष्ट करुन घ्यावे, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर व्यंकट जगताप, प्रशांत चौधरी, रामदास राठोड, अजय डोईजडे, नारायण ढवळे, प्रशांत फुलारी, वाजीद सय्यद यांच्यासह सर्व डाटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादींच्या सह्या आहेत.