मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील आयएएस अधिका-यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असून आज ८ वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्यामध्ये एमएमआरडीएचे सहआयुक्त राधाविनोद शर्मा यांची मीरा भाईंदर मनपा आयुक्तपदी बदली करण्यात आली तर उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त विकास अधिकारी एम जे प्रदीप चंद्रेन यांची बदली पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली. वैदेही रानडे यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली.
राज्यात फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून वरिष्ठ प्रशासनाचा खांदेपालट जोरदार गतीने सुरू आहे. आधी राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर आता आयएएस अधिका-यांच्या बदल्यांचा धडाका सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज ८ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये छ. संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त बाबासाहेब बेलदार यांची अल्पसंख्याक विकास आयुक्त छ. संभाजीनगर येथे बदली करण्यात आली. स्मार्ट सिटी छ. संभाजीनगरचे सीईओ जगदीय मिनियार यांची जालना जि. प. सीईओपदी बदली झाली. स्मार्ट सिटी सोलापूरचे सीईओ गोपीचंद कदम यांची आदिवासी आयुक्त ठाणे येथे बदली झाली.
एमएसआरडीसी मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक वैदेही रानडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी येथे, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूरचे सदस्य सचिव डॉ. अर्जुन चिखले यांची फी नियामक प्राधिकरण, मुंबई येथे सचिव म्हणून आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारीपदी बदली झाली. या आधी २५ फेब्रुवारी रोजी ७ वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते.