मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेट एका नव्या वळवणावर आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यात अनुभवी आर. अश्विन याने क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा केली. आता इंग्लंड दौ-यावरील कसोटी मालिकेआधी रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला टाटा बाय बाय केले आहे. कसोटी क्रिकेटमधील नव्या पर्वात धुरंधर अन् अनुभवी खेळाडू एकापाठोपाठ एक ‘आउट’ होत असताना लवकरच मोहम्मद शमीवरही हीच वेळ येईल अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगताना दिसली. पण आता खुद्द मोहम्मद शमीनं यावर मौन सोडले आहे. भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून निवृत्तीची अफवा पसरवणा-यांना सुनावले आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटीतील निवृत्तीनंतर आता मोहम्मद शमीचा नंबर आहे, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळा रंगू लागल्याचे पाहायला मिळाले. काही वृत्तांमध्ये असा दावाही करण्यात आलाय की, आगामी इंग्लंड दौ-यात मोहम्मद शमीच्या नावाचा विचार केला जाणार नाही. विराट-रोहित यांच्यानंतर रंगणा-या आपल्या निवृत्तीच्या चर्चेवर शमीने संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.
मोहम्मद शमीनं इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून आपल्या निवृत्तीसंदर्भात भविष्यवाणी करणा-या वृत्ताचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यासोबत त्याने खास कॅप्शनही लिहिले आहे. व्हेरी वेल डन! महाराज आपल्या जॉबचे किती दिवस उरलेत तेही पाहा. मग आमचे बघा. तुम्ही तर आमचे वाटोळे लावायलाच बसलाय. कधीतरी चांगले बोलत जा. या आशयाच्या शब्दांत शमीने ही खराब स्टोरी असल्याचा उल्लेख करत निवृत्तीच्या चर्चा ही फक्त अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.