लातूर : प्रतिनिधी
थंड हवा, जास्त आर्द्रता, आणि वातावरणातील बदलांमुळे दम्याचे अॅलर्जीक घटक वाढू शकतात. तापमान बदल आणि हवेतील बदल, जसे की थंड हवा, परागकण आणि प्रदूषण, यांचा दम्याच्या रुग्णांवर नकारात्मक परिणाम होतो. दम्याचा झटका येण्याची शक्यता वाढते. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉ रमेश भराटे यांनी केले.
तापमान आणि आर्द्रतेतील बदल, तसेच हवेतील प्रदूषण, न्यूमोनियाचा धोका वाढवू शकतात. विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य न्यूमोनियाचा धोका वाढतो. न्यूमोनियामध्ये फुफ्फुसांना सूज येते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. थंड हवा आणि कोरडी हवा श्वसनमार्गांना त्रास देऊ शकते. धुळीचे कण, परागकण, बुरशी, आणि हवेतील प्रदूषण दम्यासाठी ट्रिगर ठरु शकतात, असे डॉ भराटे म्हणाले. श्वसन संक्रमण जसे की सर्दी आणि फ्लू, न्यूमोनिया आणि दम्याचा धोका वाढवतात. दम्याचे रुग्ण आणि ज्यांना न्यूमोनियाचा धोका आहे, त्यांनी हवामान बदलांपासून स्वत:चे संरक्षण करावे. गरम कपडे घालावे, घराबाहेर कमी पडणे आणि घरात हवा खेळती ठेवावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात ज्यामुळे होणारी गुंतागुंत टाळता येते, असेही डॉ. भराटे म्हणाले.

