अहमदाबाद : १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे अवघ्या देशाला हादरा बसला होता. या भीषण अपघातातविमानातील प्रवाशांचा आणि क्रू मेंबर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ एका प्रवाशाला या अपघातातून आपला जीव वाचवता आला आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला होता, ज्याची तपासणी सुरू होती. अखेर तपास पथकाला यात यश मिळाले आहे.
विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, यांची माहिती या ब्लॅक बॉक्समधून मिळणार असल्याने सगळ्यांच्या नजरा त्यावर होत्या. दरम्यान आता या ब्लॅक बॉक्सच्या तपासबद्दलची नवी आणि मोठी अपडेट समोर आली आहे. २४ जून रोजी विमानाच्या समोरील ब्लॅक बॉक्समधून क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (सीपीएम) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि २५ जून रोजी त्याच्या मेमरी मॉड्यूलमध्ये यशस्वीरित्या प्रवेश करण्यात आला. तर, आता त्याचा डेटा अअकइ लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आला आहे. लवकरच या अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.
विमानाचा भीषण अपघात
१२ जून रोजी लंडनकडे जाणारे बोइंग ड्रीमलाइनर विमान टेकऑफनंतर काही सेकंदातच कोसळले. ते थेट विमानतळाच्या अगदी बाहेर असलेल्या मेघानी नगर येथील बी.जे. मेडिकल कॉलेजच्या निवासी कॅम्पसमध्ये पडले. एअर इंडियाच्या बोइंग ड्रीमलाइनर विमानाला अहमदाबादमध्ये झालेल्या या अपघातात २७५ लोकांचा बळी गेला आहे. यात विमानात असलेले २४१ प्रवासी आणि जमिनीवरील ३४ लोकांचा समावेश आहे.