नवी दिल्ली : दिल्लीतील नौदल मुख्यालयातून एका व्यक्तीला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. विशाल यादव नावाच्या या व्यक्तीवर अनेक वर्षे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. मे २०२५ मध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्याच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप आहे.
विशाल यादव याने एका महिलेला भारतीय नौदल आणि इतर संरक्षण युनिट्सशी संबंधित गोपनीय माहिती पुरवली होती, असे त्याच्या मोबाईलमधील डेटावरुन समोर आले आहे. ती एक पाकिस्तानी महिला होती आणि त्याची हँडलर म्हणून काम करत होती. हरयाणाचा रहिवासी विशाल यादव हा नौदल मुख्यालयात क्लर्क आहे. त्याला राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानचे सीआयडी इंटेलिजेंस युनिट पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या हेरगिरी कारवायांवर सतत लक्ष ठेवून होते. देखरेखीदरम्यान, विशाल यादवला आढळून आला, तो सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एका महिला हँडलरच्या संपर्कात होता. जयपूरमधील केंद्रीय चौकशी केंद्रात विशाल यादवची अनेक गुप्तचर संस्थांकडून संयुक्तपणे चौकशी केली जात आहे. या साखळीत आणखी कोण सामील आहे आणि आतापर्यंत किती संवेदनशील माहिती लीक झाली आहे.
हे शोधण्याचा प्रयत्न सुरक्षा संस्था करत आहेत. या अटकेनंतर पुन्हा एकदा हेरगिरी करणा-या टोळीकडून सोशल मीडियाचा वापर समोर आला आहे. हा पाकिस्तानचा जुना प्रकार आहे. ते एका महिलेच्या माध्यमातून भारतात बसलेल्या लोकांकडून माहिती काढत आहेत. सोशल मीडियावरील कोणत्याही संशयास्पद हालचालींबद्दल सतर्क राहण्याचे आवाहन सुरक्षा संस्थांनी लोकांना केले आहे.