24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeराष्ट्रीय३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार

३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पक्षांनी २०१९ पासून कोणत्याही निवडणुकीत सहभाग घेतलेला नाही आणि ज्यांची कार्यालये देशात कुठेही प्रत्यक्ष आढळत नाहीत, अशा पक्षांची नोंदणी रद्द केली आहे.

गुरुवारी निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे ३४५ पक्ष विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. सध्या नोंदणीकृत २८०० हून अधिक मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांमध्ये असे अनेक पक्ष आहेत जे राजकीय पक्ष म्हणून नोंदणीकृत राहण्यासाठी आवश्यक अटी पूर्ण करत नाहीत. अशा पक्षांवर मोहीम राबवून कारवाई केली जात आहे अशी माहिती आयोगाने दिली.

देशभरात मोहिम राबवणार
अशा पक्षांची ओळख पटविण्यासाठी आयोगाने देशव्यापी प्रक्रिया राबवली. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत अशा ३४५ पक्षांची ओळख पटवण्यात आली आहे. आयोगाच्या माहितीनुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना (सीईओ) अशा पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही मोहीम सुरूच आहे.

नोंदणीकृत पक्षांना अनेक सुविधा
देशातील राष्ट्रीय/राज्य/अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम २९अ अंतर्गत केली जाते. या तरतुदीनुसार नोंदणी झाल्यानंतर, राजकीय पक्षाला कर सवलतीसह अनेक सुविधा मिळतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR