कुशलनगर : एखाद्या व्यक्तीला न्यायालयाने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा दिली तर काय होईल? न्यायालयावर कारवाई होईल का? न्यायालय भरपाई देतं का? माफी मागतं का? असे प्रश्न अनेकांना पडतात. न्यायालयाकडून अशा चुका झाल्या आहेत का? असाही प्रश्न आपल्या डोक्यात येतो. अशीच एक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. कर्नाटकमधील कुशलनगरमधील सुरेश नावाच्या आदिवासी तरुणाला त्याच्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. त्याने १८ महिने तुरुंगात घालवल्यानंतर त्याची पत्नी जीवंत असल्याचे समोर आले. परिणामी सुरेशने उच्च न्यायालयाकडे ५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
कर्नाटकमधील कुशलनगर तालुक्यातील बसवनहळ्ळी गावातील रहिवासी कुरुबारा सुरेशला त्याच्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली. दीड वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर त्याची पत्नी जीवंत असल्याचे समजताच सुरेशने कर्नाटक उच्च न्यायालयाचे दार ठोठावले असून भरपाई म्हणून पाच कोटी रुपयांची मागणी केली आहे.
पोलिसांविरोधात कारवाईची मागणी
म्हैसूरमधील पाचव्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने याप्रकरणी सुरेश याला खूनाच्या आरोपातून मुक्त केले होते. तसेच गृह विभागास सुरेशला एक लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला होता. मात्र, या तुटपुंज्या भरपाईने सुरेश समाधानी झाला नाही. त्याने उच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे. त्याने ५ कोटी रुपयांची भरपाई मागितली असून कथित खूनाच्या खटल्याचा तपास करणा-या ५ पोलिस अधिका-यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुरेशने म्हटले की मला त्या पोलिसांनी न केलेल्या गुन्ह्यात अडकवले आणि माझ्याविरोधात खोटे पुरावे देखील सादर केले.