नवी दिल्ली : बॉम्बस्फोटांसह अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेला कुख्यात दहशतवादी साकिब नाचन याचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील तिहार कारागृहामध्ये कैदेत असलेल्या साकिब नाचन याला प्रकृती बिघडल्याने उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तिथे ब्रेनस्ट्रोक आल्याने नाचन याचा मृत्यू झाला. भारत सरकारने बंदी घातलेल्या सिमी या संघटनेचा साकिब नाचन हा माजी प्रमुख होता. तसेच सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावलेल्या मुंबईजवळच्या आयएसआयएसच्या पडघा मॉड्युलमधील तो प्रमुख आरोपी होता. गेल्या काही काळापासून साकिब नाचन हा दिल्लीतील तिहार तुरुंगामध्ये न्यायालयीन कोठडीत होता. सोमवारी प्रकृती बिघडल्याने त्याला दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्याला सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान प्रकृती अधिकच बिघडून त्याचा मृत्यू झाला.
रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साकिब नाचन याचा मृत्यू बुधवारी झाला होता. मात्र याची अधिकृत घोषणा उशिरा करण्यात आली. नाचन याची प्रकृती सातत्याने खालावत होती. तसेच ब्रेनस्ट्रोकमुळे त्याच्या शरीराने प्रतिक्रिया देणे बंद केले होते. मालेगाव आणि मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये साकिब नाचन याचे नावा समोर आले होते. मात्र काही प्रकरणातून त्याची मुक्तता झाली होती.
दहशतवाद्यांना होती मदत
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार साकिब नाचन याची आयएसआयएसशीसंबंधित दहशतवाद्यांच्या केलेल्या मदतीच्या आरोपाखाली चौकशी सुरू होती. त्याच्याविरोधात दहशतवादविरोधी काद्यांतर्गत गुन्हे नोंद झाले होते. तसेच दिल्ली-पडघा आयएसआयएस मॉड्युलचा साकिब नाचन हा प्रमुख भाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच साकिब नाचन हा दहशतवाद्यांना आर्थिक आणि इतर मदत करायचा असेही तपासामधून समोर आले होते.